

पिंपरी: ’पीएमपी’ बस गाड्यांचे वाढते अपघात, वाहन चालकांचा वाढलेला बेदरकारपणा, गाड्या वेळेवर न सुटणे आदी गोष्टींमुळे पीएमपी बससेवा नेहमीच चर्चेचा विषय ठरते. यासाठी प्रशासनाने पंक्च्युॲलिटी वीक राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पंक्च्युॲलिटी वीक अर्थात वेळेवर बस सुटणे, चालक व वाहकांनी वेळेवर हजर राहणे, वेळपत्रकानुसार बस सोडणे, गैरहजर कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करणे. यामुळे प्रवाशांना विश्वासार्ह तसेच दर्जेदारसेवा मिळेल, या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखरेख ठेवण्यात येईल व निष्काळजीपणा आढळल्यास दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
पीएमपी प्रशासनाच्या वतीने यापूर्वी फिल्ड वीक, स्वच्छता आठवडा हे दोन उपक्रम राबविले होते. या उपक्रम अंतर्गत बस गाड्यांची स्वच्छता, तांत्रिक स्थिती कर्मचारी, कामकाज, आणि प्रवाशांच्या तक्रारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. त्यावेळी आढळून आलेल्या त्रुटींवर सुधारणा सुरु आहे, आता पुढील टप्यात वक्तशीरपणा हा प्रमुख मुद्दा मानून पीएमपीकडून पंक्च्युॲलिटी वीक राबविला जाणार आहे.
तसेच या आठवडऱ्यात वारंवार रद्द होणाऱ्या फेऱ्यांची तपासणी केली जाणार आहे; तसेच तांत्रिक बिघाडामुळे होणारे विलंब कमी करण्यासाठी तत्काळ दुरुस्तीच्या सुचना देण्यात येणार आहेत. रिअल टाइम मॉनिटरिंग म्हणजेच उशिराने धावणाऱ्या गाड़यांवर तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारची शिस्त निर्माण होईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपी बससेवेचा लाभ विद्यार्थी, कामगार होतो; परंतु या प्रवाशांच्या दृष्टीने बस वेळेवर मिळणे गरजेचे असते; मात्र अनेकदा बस गाड्या वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थी तसेच कामगारांना वेळेवर पोचता येत नाही. परिणामी अनेकजण खासगी प्रवासी गाड्यांना प्राधान्य देतात. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
पीएमपीच्या वतीने वेळेवर बस सोडण्यासाठी पंक्च्युॲलिटी वीक राबविला जाणार आहे. उपक्रम सुरु केल्यानंतर आढळलेल्या त्रुटींवर कार्यवाही केली जाणार आहे. तसेच पंक्च्युॲलिटी वीकमुळे दररोजची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल पुणे