

हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: शहरातील ओला आणि उबेर सारख्या ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा प्रवाशांसाठी सोयीऐवजी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. जादा भाडे आकारणे, राईड रद्द करणे आणि प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली असून, कंपन्यांचे चालकांवर नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकलसेवा तोकडी असल्याने रात्रीच्या वेळेत लोकल किंवा बस मिळणे प्रवाशांना मोठे त्रासाचे ठरते. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने ओला- उबेरचा आसरा घ्यावा लागतो. या परिस्थितीचा फायदा काही चालकांकडून घेतला जात आहे. ॲपआधारित ओला व उबेरचे भाडे निश्चित झाल्यानतंरही चालक, निश्चित भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारले जाते. प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतेही माहिती दिली जात नाही. त्यामुळे प्रवासी व चालक यांच्यात वादावादीचे प्रसंग घडत असून प्रवाशांना नाईलाजाने जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड पडत आहे.
लाबंच्या पल्यासाठी जादा पैसे देणार असाल तर सोडतो अथवा, आम्हांला लांबचे भाडे परवडत नाही असे सांगतले जाते. प्रवाशांची होणारी लूट व फसवणूक थांबावी यासाठी शहरवासियांकडून परिवहन विभागाकडे तक्रारी करण्यात येत आहेत. ॲप आधारित या कंपन्यानी त्यांच्या चालकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कठोर नियम लागू करावे. प्रत्येक तक्रारीची गांभीयाने दखल घ्यावी; तसेच दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
लूज पेमेंटची मागणी
अनेक कॅबचालक प्रवाशांना बसण्यापूवी ॲपवरून निश्चित झालेले भाडे परवडत नसल्याचे सांगतात. किलोमीटर प्रमाणे भाडे द्यावे लागेल, असे सांगितले जाते. अथवा दुसरी कॅब बुक करण्याचा अनाहूत सल्ला दिला जातो; मात्र रात्रीच्यावेळी प्रवाशांना घर गाठणे गरजेचे असल्याने प्रवासी नाईलाजाने जादा पैसे मोजतात.
रात्रीच्या वेळेत लवकर घरी जाण्यासाठी प्रधान्य देते. कारण रात्रीच्या वेळेत खूप वेळ थांबणे सुरक्षित नसल्याने कॅब चालकांना त्यांच्या म्हणण्यानुसार भाडे द्यावे लागते.
माया कांबळे प्रवासी महिला
ॲप आधारित प्रवासी सेवेचे भाडे निश्चित असताना कॅब चालकांनी मनमानी भाडे घेणे योग्य नाही. ती जवाबदारी त्या कंपनीची आहे. त्यामुळे कॅबचालकांनी किलोमीटरप्रमाणे भाडे आकारु नये. जादा भाडे आकारल्यास दोषी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी