

पिंपरी: तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी रविवार (दि. 28) जाहीर होत असल्याने नाराजांना गळ घालण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस अशी आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा रविवार हा निवडणुकीसाठी ‘सुपरसंडे’ ठरणार आहे.
फेब्रुवारी 2017 नंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मोठ्या जोशाने निवडणुकीची तयारी करीत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होऊन पाच दिवस झाले आहेत. तर, उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार (दि. 29) आणि मंगळवार (दि. 30) असे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना, अद्याप उमेदवारी यादी प्रसिद्ध न झाल्याने तयारीस लागलेल्या सर्वच इच्छुकांची धाकधूक कायम आहे. भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा बार खर्या अर्थाने उडणार आहे. त्यानंतर इतर पक्षांकडूनही त्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार जाहीर केले जातील.
भाजपाकडे इच्छुकांचा भरणा सर्वाधिक आहे. उमेदवारी 100 टक्के आपल्यालाच मिळणार, अशी खात्री बाळगत अनेक इच्छुक प्रभागात प्रचारात उतरले आहेत; मात्र यादीत त्यांच्याऐवजी दुसर्याचे नाव जाहीर झाल्यास ते नाराज बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. असे नाराज तसेच, बंडखोरांना हेरण्याचे प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून होऊ शकतात. त्यासाठी काही पदाधिकार्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपाच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. शनिवार (दि. 27) रात्री उशीरापर्यंत दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांची पुन्हा बैठक झाली. त्यात दोन ते तीन जागांचा तिढा निर्माण झाला होता. त्यावर तोडगा निघाल्याने दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे; मात्र पुण्यात दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये ते एकत्र येतील, अशी अट शरदचंद्र पवार पक्षाकडून घालण्यात आली आहे. त्यावर रविवारी अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
तर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, मनसे आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या पदाधिकार्यांमध्येही आघाडीबाबत आज पुन्हा चर्चा झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष वगळून आघाडी करण्यावर सर्वांनी सकारात्मकता दाखवली आहे. त्याबाबत उद्या घोषणा होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यादी जाहीर होण्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल
भाजपाकडून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. असे असताना काही उमेदवारांकडून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काहींनी परस्पर पॅनेल ठरवून आपले अर्ज मिरवणुका काढत दाखल केले आहे. मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर प्रभाग क्रमांक 10 मध्ये माजी उपमहापौर तुषार हिंगे, अनुराधा गोफणे, सुप्रिया चांदगुडे व कुशाग्र कदम यांनी आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावरुन माजी उपमहापौर केशव घोळवे यांची उमेदवारी कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून संदेश गादिया, प्राजक्ता गावडे, बिभीषण चौधरी, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून नीलेश बारणे, संतोष बारणे, विश्वजीत बारणे आणि काँग्रेसकडून चंद्रकांत लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अनेकांनी परस्पर पॅनेल जाहीर करून प्रचाराला सुरुवात
भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी काही प्रभागात संपूर्ण पॅनेल जाहीर करून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. सोशल मीडियावर पॅनेलच्या उमेदवारांचे छायाचित्रे व्हायरल केले जात आहेत. प्रभागात जोरदार रॅली काढत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहे. पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर झालेली नसताना परस्पर उमेदवारी घोषित करून प्रचार सुरू केल्याने प्रभागात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
नाराजांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न
भाजपाकडून उमेदवारीची यादी जाहीर झाल्यानंतर त्या पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अशा नाराजांना गळ लाऊन आपल्या पक्षाची उमेदवारी देण्याची तयारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. सक्षम बंडखोर, नाराज राष्ट्रवादीच्या गळास लागल्यास त्या पक्षाचा विजय अधिक सुकर होईल, असा दावा करण्यात येत आहे.
पाचव्या दिवशी 36 जणांनी उमेदवारी अर्ज केले दाखल
महापालिका निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी शनिवार (दि. 27) एकूण 36 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 49 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाचे तुषार हिंगे, शिवसेनेचे नीलेश बारणे, संदेश गादिया तसेच, मधुरा शिंदे, प्राजक्ता गावडे, भाग्यश्री कसबे, मनिषा शिंदे, अभय भंडारे, रिमा मेंगळे, शुभांगी शिंदे, श्रृती तोरडमल, बिभीषण चौधरी, सचिन सोनकांबळे, प्रसार ताठे, बाळासाहेब मोरे, गिरीश वाघमारे, चंद्रकांत लोंढे, बेबी बोचकुरे, अनुश्री कुंभार,, विशाल जाधव, अक्षय जगताप, संतोष बारणे, रेखा माने, ललित म्हसेकर, रसिका त्रिभुवन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.