

पिंपरी: अनेक गावांचे मिळून झालेली औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे असले तरी, शहरातील नाते-गोते, गावकी-भावकी अद्याप कायम आहे. सध्या शहरात महापालिका निवडणुकीचे वातावरण जरी तापले असले तरीदेखील नात्यागोत्यातील उमेदवार समोरासमोर लढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक रिंगणात समोरासमोर आलेच तर समोर कमी ताकदीचा उमेदवार दिला जातो. प्रमुख पक्षांतील नेत्यांच्या या छुप्या युतीमुळे महापालिका निवडणुकीसाठी ‘मॅच फिक्सिंग’ झाले का, अशी चर्चा राजकीय पटावर सुरू आहे.
गावपण केले तरी, शहरात नाते-गोते, गावकी-भावकी, पै-पाहुणे यांचा आदर सन्मान अद्यापही राखला जात आहे. गावकी भावकीतच लग्न ठरवले जाते. गावाने एकमताने ठरविल्यानंतर नात्या-गोत्यातील उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण गाव व परिसर उभा राहतो. उमेदवार कोणत्या पक्षाचा हा मुद्दा त्यावेळी गौण ठरतो. स्थानिकांची ही एकजूट लक्षात घेऊन राजकीय पक्ष गाववाल्यासमोर गाववाला उमेदवार देत नाहीत. निवडणूक सुलभ व्हावी. गावाचा स्थानिक उमेदवार विजयी व्हावा म्हणून असे प्रकार केलेले जातात, हे या शहराचे उघड गुपित आहे. त्यातून प्रमुख राजकीय पक्षांचा पडद्यामागे समजोता तसेच, छुपी युती झाल्याची चर्चा निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून येते. यंदाच्या निवडणुकीत शहरात साने, बोराटे, आल्हाट, बोऱ्हाडे, जाधव, सस्ते, तापकीर, घुले, फुगे, गोफणे, गवळी, नेवाळे, लोंढे, लांडे, पठारे, बहिरवाडे, पवळे, चिखले, कुटे, यादव, काळभोर, गावडे, तरस, भोईर, गोलांडे, वाघेरे, पाडाळे, नढे, कोकणे, भुजबळ, वाकडकर, दर्शले, चौंधे, कस्पटे, कामठे, साठे, खुळे, थोपटे, नखाते, भिसे, कदम, जगताप, जवळकर असे आडनाव असलेले गाववाले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; मात्र ते समोरासमोर लढत नसल्याचे चित्र प्रभागातील लढतीवरून दिसून येते. प्रभागात एकमेकांसमोर गाववाले येऊ नये, अशी दक्षता सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. नातेगोत्यातील उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली असल्याचे दिसून येते.
तर, अनेक प्रभागात पक्षाचे शहराध्यक्ष तसेच, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कमकुवत आणि नवखे उमेदवार देण्यात आले आहेत. त्यातूनही प्रमुख पक्षांचे साटेलोटे झाल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या विरोधात सतीश नागरगोजे हा नवखा उमेदवार भाजपाने दिला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेश काटे, राष्ट्रवादीच्या नाना काटे यांच्या विरोधात संदेश काटे असे नवखे उमेदवार दिले आहेत. आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने निलिमा पवार या नवख्या उमेदवारास रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीच्या संदीप वाघेरेंच्या विरोधात भाजपाने गणेश ढाकणे हा उमेदवार दिला आहे. भाजपाच्या उषा वाघेरेंच्या विरोधात राष्ट्रवादीने प्रियांका कुदळे यांना उमेदवारी दिली आहे. माजी महापौर उषा ढोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उज्ज्वला ढोरे तर, भाजपाच्या हर्षल ढोरे यांच्या विरोधात प्रसाद शिंदे असे नवखे उमेदवार दिले आहे. भाजपाच्या नवनाथ जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अरुण पवार यांना उमेदवारी दिली आहे. या सामन्यावरून थेट लढती न होता ‘नुरा कुस्ती’ होणार, हे स्पष्ट होत आहे.
या प्रभागात स्थानिक समोरासमोर
काही प्रभागात गाववाले समोरासमोर थेट लढत आहेत. त्या लढतींकडे शहराचे लक्ष लागले आहे. प्रभाग 6 मध्ये योगेश लांडगे विरुद्ध संतोष लांडगे, प्रभाग क्रमांक 9 मध्ये शीतल मासुळकर विरुद्ध सारिका मासुळकर, प्रभाग 12 मध्ये पंकज भालेकर विरुद्ध शांताराम भालेकर, प्रभाग क्रमांक 16 मधील दोन जागांवर मोरेश्वर भोंडवे विरुद्ध दीपक भोंडवे आणि आशा भोंडवे विरुद्ध संगीता भोंडवे, प्रभाग क्रमांक 17 मध्ये सचिन चिंचवडे विरुद्ध शेखर चिंचवडे व पल्लवी वाल्हेकर विरुद्ध शोभा वाल्हेकर विरुद्ध सुप्रिया वाल्हेकर, प्रभाग क्रमांक 20 मध्ये मनीषा लांडे विरुद्ध रश्मी लांडे हे समोरासमोर आले आहेत. प्रभाग क्रमांक 23 ब मध्ये तानाजी बारणे, विशाल बारणे व संतोष बारणे आणि ड जागेवर अभिषेक बारणे, प्रवीण बारणे, प्रभाग क्रमांक 24 अ मध्ये सिद्धेश्वर बारणे, संतोष बारणे, विश्वजीत बारणे आणि ड मध्ये मंगेश बारणे व नीलेश बारणे, प्रभाग क्रमांक 25 मध्ये राहुल कलाटे विरुद्ध मयुर कलाटे, प्रभाग क्रमांक 28अ मध्ये शत्रुघ्न काटे विरुद्ध उमेश काटे, ब जागेवर अनिता काटे विरुद्ध शीतल काटे, ड जागेवर संदेश काटे विरुद्ध नाना काटे, प्रभाग क्रमांक 30 मध्ये संजय काटे विरुद्ध रोहित काटे यांच्यात सामना आहे. प्रभाग क्रमांक 31 मध्ये ज्ञानेश्वर जगताप विरुद्ध राजेंद्र जगताप, प्रभाग क्रमांक 32 क मध्ये उषा ढोरे विरुद्ध उज्ज्वला ढोरे आणि ड जागेवर प्रशांत शितोळे विरुद्ध अतुल शितोळे असे समोरासमोर उमेदवार आहेत. माघार घेण्यास कोणी तयार नसल्याने तसेच, इच्छुकांना विजयाचा विश्वास असल्याने काही प्रभागात गाववाले समोरासमोर ठाकले आहेत. गावकीच्या एकमुखी निर्णयामुळे कोण, विजयी होणार, हे ठरविले जाते. अधिक जण इच्छुक असल्यास आलटून पालटून एकाला संधी दिली जाते. पक्षही गावाच्या निर्णयासाठी तडतोड करत असल्याचे दिसून येते.
भाजपा प्रदेशाध्यक्षांची शहराध्यक्षांना तंबी
भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये प्रत्येकी दोन जागा वाटून घेतल्याची उघड चर्चा आहे. तसे न करता तेथे संपूर्ण पॅनेल भाजपाचे आणावे, अशी तंबी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष काटे यांनी दिली आहे. येथे भरपूर नेते आहेत. शायनिंग मारू नका. प्रभागात पॅनेलचे काम करा. सेटींग करू नका. आमदारांनीही प्रभागावर लक्ष ठेवावे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतर खुद शहराध्यक्षांच्या प्रभागात भाजपाचे पॅनेल विजयी होते का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपाचे उमेदवार बिनविरोध कसे होतात?
शहरात भाजपाचे रवी लांडेग आणि सुप्रिया महेश चांदगुडे हे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार का दिला नाही. राष्ट्रवादी गाफील का होती. प्रभागातील उमेदवाराने माघार का घेतली, का हे सर्व पूर्वनियोजित होते काय, अशी चर्चा रंगली आहे.