

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांना घेरले आहे. पक्षापेक्षा मुलगा आणि पुतण्याच्या प्रेमात अडकलेले खा. बारणे यांना भाजपाने अक्षरश: खिंडीत घेरले आहे; तसेच पुढील लोकसभेसाठी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी माजी महापौर संजोग वाघेरे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यावरून बारणेंची खासदारकीही धोक्यात आली आहे.
खासदार बारणे यांना मुलगा आणि पुतण्यासाठी भाजपासोबत युती करून त्या पक्षाची ताकद सोबत घ्यायची होती. त्यामुळे मुलगा व पुतण्या आयतेच निवडून येतील, असा त्यांचा आत्मविश्वास होता. त्यासाठी ते अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाशी युती करण्यासाठी धडपडत होते. भाजपाने युतीवरून झुलवत ठेवत ऐनवेळी युतीस नकार दिला. काही जागेवरील उमेदवार बदला. आमचे उमेदवार तुमच्या पक्षात घेऊन त्यांनाच तिकीट द्या, अशी भाजपाने आग्रही भूमिका घेतली होती. भाजपाने खा. बारणे यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले. सुरुवातीला युतीत सन्मानजनक वाटा मिळेल, असे संकेत देण्यात आले होते. प्रत्यक्षात जागा वाटपात शिवसेना व खा. बारणे यांना दुय्यम वागणूक देण्यात आल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
परिणामी अनेक इच्छुक नाराज झाले. काहींनी अपक्ष म्हणून उडी घेतली. तर, काहींनी राजकारणातून तात्पुरती माघार घेतली. भाजपाकडून जागा वाटपाच्या मुद्द्यावर शिवसेनेला झुलवत ठेवण्यात आले. खासदारांनी आपल्या मुलाचाच विचार केल्याने युती झाली नसल्याची खदखद कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. विश्वजीत बारणेंच्या विरोधात भाजपाने सिद्धेश्वर बारणे हे तगडे उमेदवार दिले आहेत. ती अटीतटीची लढत ठरणार आहे. संपूर्ण शहरावर लक्ष देण्यापेक्षा खासदार केवळ मुलासाठी थेरगाव प्रभागात अधिक लक्ष घालतात; तसेच घरगुती वाद, मुलगा व पुतण्याच्या प्रेमापोटी ही युती तुटली, असेही पक्षाचे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत.
शहरासह या प्रभागात शिवसेनेची फारशी ताकद नाही. संघटन मजबूत नाही. सक्षम पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख नाहीत. युती तुटल्याने मुलासाठी खासदारांना प्रभागात स्वत: लक्ष देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खासदारांचा मुलगा अडचणीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच, भविष्यात लोकसभेचा मतदारसंघ भाजपाकडे ओढून घेण्याची रणनिती आखण्यात आली आहे. त्या हेतूनेच माजी महापौर संजोग वाघेरे यांना भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभा लढताना संजोग वाघेरे यांनी बारणेंना ‘काँटे की टक्कर’ दिली होती. निव्वळ भाजपाने ताकद लावल्याने बारणे हे निवडून आले. त्यामुळे भाजपाने स्वपक्षाचा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. त्याचा भाग म्हणूनच खा. बारणे यांचे महापालिका निवडणुकीत खच्चीकरण करण्याचा डाव भाजपाने आखला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सत्ता असून शिवसेना संघटन कमकुवत
पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाची संघटनात्मक तयारीचा अभाव उघड झाला आहे. सत्ता आहे, पण संघटन नाही, अशी पक्षाची अवस्था झाली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत अंतर्गत संघर्ष असूनही निवडणूक मैदानात ठामपणे उतरली आहेत. भाजपाने सर्वाधिक ताकद लावली आहे. अशा स्थितीत शिवसेनेची पिछेहाट ही केवळ युतीतील तक्रार न राहता भविष्यातील राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तीनदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांची सक्षम पकड नसल्याने महापालिका निवडणुकीत ठळकपणे दृष्टीस पडत नाही. उमेदवारी अर्ज, चिन्ह वाटप आणि माघारीनंतर स्पष्ट झालेल्या निवडणूक चित्रात पक्षाची संघटनात्मक कमजोरी उघड झाली आहे. अनेक प्रभागांत पक्ष अक्षरशः नामशेष झाल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी उमेदवार उभे राहू शकले नाहीत. तर काही प्रभागांत शेवटच्या क्षणी इतर पक्षांतील नाराजांना आयात करावे लागले आहेत.