

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा सरळ सामना असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षांकडून स्टार प्रचारक मैदानात उतरविण्यात येणार आहेत. प्रचाराच्या नऊ दिवसांच्या रणधुमाळीत शहरात प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. त्यामुळे साहजिकच आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडणार आहे.
महापालिकेत 128 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा उत्साह वाढला आहे. उर्वरित 126 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. भाजपाने 120 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कमळ चिन्हावर 5 जागा लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सर्वाधिक 124 जागेवर लढत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढत आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 57, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 48, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13, काँग्रेसचे 45, आम आदमी पार्टीचे 35, वंचित बहुजन आघाडीचे 29 आणि बहुजन समाज पार्टीचे 15 उमेदवार निवडणूक रणसंग्रामात आहेत. तर, अपक्ष आणि बंडखोरांची संख्या तब्बल 166 आहे.
निवडणुकीत प्रमुख लढत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निगडी येथे प्रचाराची सुरूवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्नही केला. आता शहरात मंगळवार (दि. 6) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशीष शेलार, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, गणेश नाईक, जयकुमार रावल, नीतेश राणे, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, अशोक उईके तसेच, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, गोपीचंद पडळकर तसेच, खासदार व आमदार आदी स्टार नेत्यांची फळी प्रचारासाठी शहरात येणार आहे. शहरातील अनेक भागांत त्यांच्या सभा व मेळावे घेण्यात येणार आहेत.
भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिकेत आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळवडे व चिखली येथे प्रचाराची सुरूवात करताना भाजपावर महापालिकेच्या भ्रष्टाचारावरून तोफ डागली. त्यानंतर पिंपरीत पत्रकार परिषदेत घेत भाजपावर घणाघात केला. मंगळवार (दि. 6) पिंपरीगावात अजित पवार यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष, ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अशोक पवार, धनंजय मुंडे यांच्या सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे स्वत: पिंपरी-चिंचवड निडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. तसेच, नेत्या खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, युवा नेते रोहित पवार, खासदार नीलेश लंके, अमोल कोल्हे यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच, शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षाचे प्रमुख नेते व स्टार प्रचारकांच्या सभा तसेच, रॅली शहरात होणार आहे. या सभामुळे शहरात प्रचाराचा धुराळा उडणार आहे.