

खराळवाडी: पिंपरीत घरपोच गॅस सिलिंडर 96 तासांत देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश फक्त कागदावरच राहिला आहे. गॅस वितरकांकडून या आदेशाचे पालन केले जात नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. चक्क गॅस वितरकांकडूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. शहरात नागरिकांना आठ, दहा दिवस तर सोडाच पंधरा दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव नाराजी आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी 16 मार्च रोजी बुकिंगनंतर 96 तासांत सिलिंडर घरपोच मिळणे बंधनकारक केले आहे. ओटीपीद्वारेच गॅसधारकांना गॅस वितरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. शहरातील विविध ठिकाणी बुकिंग केल्यानंतर दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील 38 लाखांहून अधिक गॅसधारकांचा पुरवठा 2002 एजन्सी मार्फत केला जातो. पिंपरी चिंचवड पुरवठा विभागाकडे शहरातील अधिकृतपणे आकडेवारी नसल्याचे समोर आले आहे.
घराबाहेर चूल पेटवण्याची वेळ
गॅस सिलिंडर टंचाईमुळे घरोघरी स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही नागरिकांना गॅस संपल्याने घराबाहेर उपलब्ध जागेत चूल पेटवून स्वयंपाक करावा लागत आहे. त्यासाठी लाकूड किंवा कोळसा शोधण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यातही सिलिंडर मिळत नसल्याने लाकूड वखार आणि कोळसा विक्रेत्यांनीदेखील दरवाढ केल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
उपाशीपोटी राहण्याची वेळ
गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील कुटुंबावर उपाशीपोटी राहाण्याची वेळ आली आहे. काही भागात उपहारगृह, सार्वजनिक खानावळी बंद असल्याने काही कुटुंबातील सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक शेगड्याचा मार्ग अवलंबला आहे. ज्यांना साधने खरेदी करण्याची ऐपत नाही अशा कुटुंबातील नागरिकांमधून चीडचीड ऐकायला मिळते.
दहा दिवसांपूर्वी सिलिंडर बुक केला, पण अजून मिळालेला नाही. गॅस संपल्यामुळे बाल्कनीत चूल पेटवून स्वयंपाक करावा लागत आहे. शेवटी इलेक्ट्रिक शेगडी घ्यावी लागली.
ॲड बी. के. कांबळे, पिंपरी
16 मार्चला गॅस बुकिंग केले आहे. 96 तासांत सिलिंडर देण्याचे आदेश असताना एजन्सीवाले ग््रााहकांचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. एकप्रकारे ग््रााहकांची मुस्कटदाबी सर्रासपणे केली जात आहे. यामुळे नागरिकांचा नाईलाज होत आहे.
प्रवीण कांबळे, गांधीनगर
वीस दिवसांपासून सिलिंडर संपले आहे. रोज बाहेर हॉटेलमधून जेवण मागावे लागते. आता सिलिंडर तुटवड्यामुळे तेही परवडत नाही. जेवणाचे दर वाढवले आहेत. कसेबसे दिवस काढायची वेळ आली आहे.
हिराचंद जाधव, पिंपरी
गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर बुक करतोय; परंतु गॅस बुकिंगला अडचणी येतात. घरात स्वयंपाक करायला अडचणी येत आहेत. जगावे की मरावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नितीन कोरबन, काळेवाडी