

लोणावळा: महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेला कार्ल्यात उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेच्या निमित्ताने आज षष्टीच्या दिवशी (24 मार्च) आई एकवीरा देवीच्या माहेरघर असलेल्या देवघरात तिच्या भावाच्या अर्थात श्री काळभैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
दुपारपासूनच मुंबई, रायगड, कोकण आणि तळकोकण भागातून आलेल्या शेकडो पालख्या श्री काळभैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी कार्ल्यात दाखल झाल्या होत्या. रात्री पावणेआठ वाजता भैरवनाथ महाराजांची महाआरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविकांनी पालखी खांद्यावर घेत भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात पालखी काढली. देवघर येथील तळ्याला प्रदक्षिणा घालत पालखी पुन्हा मंदिराजवळ आली.
दरम्यान, कोकण भागातून आलेल्या शेकडो पालख्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविकांनी याठिकाणी जल्लोष करत आई एकवीरा माते की जय व श्री काळभैरवनाथ महाराज की जयच्या आरोळ्यांनी परिसर दुमदुमून सोडला होता. अतिशय भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरणात हा पालखी सोहळा पार पडला. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची संख्यादेखील जास्त होती.
पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा म्हणून पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. दिवसभर हजारो भाविकांनी श्री काळभैरवनाथांचे दर्शन घेतले. त्यामुळे देवघर परिसर गजबजून गेला होता. काळो आणि आग्री समाजातील असंख्य भाविक आणि पालख्या येथे दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसत होता. वाकसई फाटा ते देवघर हा संपूर्ण परिसर भाविक व पालख्यांनी गजबजला होता. स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी करत पालखी दर्शन व मिरवणूक सोहळ्याचा आनंद घेतला
पालखी सोहळ्यानंतर भाविकांनी व पालख्यांनी आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे प्रस्थान केले. श्री काळभैरवनाथ व महादेव देवस्थान ट्रस्ट तसेच श्री काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने व देवघर ग्रामस्थ यांच्या वतीने भाविकांसाठी स्वागत आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दिनेश तायडे आणि त्यांच्या टीमने बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन करून सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली. पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून यात्रेसाठी विशेष बंदोबस्त देण्यात आला आहे.