

पिंपरी: ईदनिमित्त लावलेले स्पीकर पाहण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाला जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी कडे आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार (दि. 21) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास पवारवस्ती, दापोडी येथे घडली.
शिफ्टेन खान, आझाम खान, सुफियान नौशाद अन्सारी आणि उमर (सर्व रा. पवार वस्ती, दापोडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी 15 वर्षीय मुलाने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास आरोपी सुफियान याने बोलावल्यामुळे फिर्यादी मुलगा आपल्या काकाचा मुलगा, आत्याचा मुलगा यांच्यासोबत पवारवस्ती येथे स्पीकर पाहण्यासाठी गेला होता. तिथे आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी कड्याने आणि डोक्याच्या मागे कोयत्याने वार केले. दापोडी पोलिस तपास करत आहेत.
बनावट टोल-फ्री क्रमांकावरून 18 लाखांची फसवणूक
बँकेचा टोल फ्री क्रमांक शोधताना चुकीच्या नंबरवर संपर्क झाल्याने एका व्यक्तीची 18 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक झाली. ही घटना जानेवारी 2025 मध्ये ऑनलाईन पद्धतीने सांगवी येथे घडली. याप्रकरणी एकाने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी मोबाईल क्रमांक धारक आणि बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एटीएम कार्ड चालत नसल्याने त्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्याकडून बँकेच्या क्रमांकाशी साधर्म्य असलेल्या आरोपींच्या नंबरवर संपर्क झाला. आरोपीने फिर्यादीला विश्वासात घेऊन व्हॉट्स पवरून ओटीपी मागवून घेतला. तुमचे एटीएम कार्ड घरी येईल असे सांगून आरोपीने फिर्यादीच्या खात्यातून 18 लाख 45 हजार रुपये काढून घेतले. बरेच दिवस झाले तरी त्यांचे एटीएम कार्ड घरी आले नाही. त्याबाबत त्यांनी बँकेकडे पाठपुरावा केला असता अशा प्रकारे त्यांचा बँकेशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलिस तपास करत आहेत.