

पिंपरी: फुगेवाडी विषारी दारूकांडात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा आणि स्थानिक नागरिकांचा संताप सोमवारी (दि. 1) सायंकाळी पुन्हा एकदा उफाळून आला. या प्रकरणातील आरोपींना तपास आणि पंचनाम्यासाठी सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी त्यांना पाहताच आक्रोश सुरू केला. काही नातेवाईक आरोपींच्या दिशेने धावले. तर, महिलांनी टाहो फोडत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
विषारी दारूकांडाच्या तपासासाठी सीआयडीचे पथक आरोपींना घेऊन सोमवारी सायंकाळी उशिरा फुगेवाडीतील घटनास्थळी दाखल झाले होते. तपास आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असताना परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. या दारूकांडात मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक, बाधित कुटुंबीय आणि स्थानिक रहिवासी आरोपींना पाहण्यासाठी घटनास्थळी थांबले होते.
तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा वाहनाकडे नेण्यात येत असताना अचानक वातावरण तापले. आरोपींना समोर पाहताच अनेक नातेवाईकांचा संयम सुटला. काही महिला रडत-रडत आरोपींच्या दिशेने सरसावल्या. आमची पोरं मेली... आमच्या पोरांचं वाटोळं केलं... आमची पोरं भरून दे..., अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. काही महिलांनी हंबरडा फोडत आरोपींना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न
मृतांच्या कुटुंबीयांच्या वेदना या वेळी स्पष्टपणे दिसून येत होत्या. आमचा भाऊ गेलाय... माझा नातू गेलाय..., असे म्हणत अनेकांनी पोलिसांसमोर दुःख व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूंच्या मालिकेमुळे हादरलेल्या कुटुंबीयांच्या भावना या वेळी अनावर झाल्या होत्या. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात येताच पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झालाय ना... आता आम्ही कारवाई करतोय, असे सांगत पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर संतप्त नातेवाईकांनीच गुन्हा दाखल करून आमची माणसं परत येणार आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. या वेळी काही नातेवाईक आणि नागरिक आरोपींच्या दिशेने धावल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थिती चिघळू नये, म्हणून सीआयडीचे अधिकारी आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी तातडीने आरोपींभोवती सुरक्षा कवच निर्माण केले. आरोपी आणि संतप्त नागरिक यांच्यामध्ये पोलिसांनी मानवी साखळी उभारून त्यांना सुरक्षितपणे वाहनापर्यंत पोहोचविले.
व्हिडीओ व्हायरल
या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये महिलांचा आक्रोश, नातेवाईकांच्या भावना आणि आरोपींना पाहताच उसळलेला संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. विषारी दारूकांडात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे आरोपींविषयीचा रोष अद्यापही कमी झालेला नसल्याचे सोमवारी घडलेल्या या प्रकारातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
आरोपींना घटनास्थळी आणल्याने अनेकांचा संताप
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांमध्येही तीव्र नाराजी दिसून येत होती. आरोपींना घटनास्थळी आणल्याने अनेकांचा संताप उफाळून आला होता. जमावाची आक्रमकता वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आरोपींना तत्काळ वाहनात बसवून तेथून रवाना केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.