

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात मोठा तलाव आहे. या तलावात असणारे पाणी आणि आजूबाजूच्या वनराईमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर फेरफटका मारण्यासाठी येथे येत आहेत. यामुळे तळ्याचा परिसर पर्यटकांनी दररोज सकाळी व सायंकाळी गजबजून जात आहे.
तलाव परिसरात आंबा, जांभूळ, अशोक, वड, पिंपळ आदी वृक्षांची सुमारे तीन हजार झाडांची वनराई बहरली आहे. यामुळे तेथे सतत पक्षांचा किलबिलाट, चिवचिवाट असतो. या तलावामुळे तळेगावच्या वैभवात भर पडत आहे. तलावाचा राऊंड सुमारे दोन किलोमीटरचा आहे. अनेकजण व्यायाम, शारीरिक कसरती करण्यासाठी येथे येतात. तर ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यांना बसण्यासाठी लायन्स क्लबने बाकडे ठेवली आहेत. तेथे अनेकजण विश्रांती घेतात. रोटरी क्लबने व्यायामाचे साहित्य ठेवले आहे. तसेच तलावात फेरी मारण्यासाठी पायाने चालविण्याची बोटही आहे.
एका वेळी या बोटीत चारजण बसू शकतात त्याचा आनंद अनेक जण घेतात. सायंकाळच्या सुमारास तरुणाईची, ज्येष्ठ नागरीकांची, अबालवृध्दांची, महिलांची गर्दी असते. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे आणखी गर्दी वाढत आहे. परगावरुन आलेले पाहुणे मंडळी आवर्जून या तलावावर फेरफटका मारणेसाठी येतात. सभोवतालचे गाय, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरेही तेथे पाणी पिण्यासाठी येत असतात. या तलावात यांत्रिक बोटीबाबत आणि तलावाचे राऊंडवर लहान मुलांसाठी घोडे, उंटबाबत तसेच खाद्यपदार्थ मिळणेबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. यामुळे अनेक गरजूंची उदरनिर्वाहाची सोय होईल.
कारंजे बंद
तळेगाव स्टेशन येथील तलावात नागरिकांचे आकर्षण ठरणारे कारंजे सध्या बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी कारंजे पाहण्यासाठी येणारे लहान मुले तसेच नागरिकांमध्ये नाराजी आहे. कारंज्यांमुळे तलावाच्या सौंदर्यात भर पडत असून, नागरिकांना प्रसन्न वाटते. यामुळे संबंधित प्रशासनाने येथील कारंजे त्वरित दुरुस्त करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. यामुळे महामार्गावरील प्रवासी देखील पर्यटनासाठी येथे येतील. यामुळे पर्यटनात वाढ होऊन स्थानिक व्यावसायिकांना याचा फायदा होऊ शकतो.
प्रेमीयुगुलांचा अड्डा
तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनराई आहे. तसेच निसर्गरम्य परिसर असल्यामुळे तळेगाव परिसरातील तसेच आजूबाजूच्या ठिकाणावरील आणि कॉलेजमधील तरुण तरुणी येथे येतात. परंतु त्यांच्या अंगविक्षेप आणि इतर चाळ्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनी येथे फिरण्यासाठी यावे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे झाडाझुडपांमध्ये आडोशाला बसणार्ऱ्या प्रेमीयुगुलांमुळे पर्यटनस्थळास गालबोट लागणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
तळेगाव स्टेशन तलावावर दुपारच्या सुमारास काही प्रेमीयुगुले राजरोसपणे बसतात. काही झाडांच्या आडोशाला बसतात. यामुळे या सुंदर ठिकाणास गालबोट लागत आहे. तरी प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी. तसेच कारंजे सुरू करावेत.
गिरीश खेर, माजी उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे