

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मालमत्ताकर भरण्यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पालिकेच्या तिजोरीत 961 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामध्ये घर बसल्या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत 5 लाख 11 हजार 603 मालमत्ताधारकांनी तब्बल 697 कोटी रुपयांचा कर भरला असल्याची माहिती करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत एकूण 7 लाख 87 हजार 184 मालमत्ताधारकांपैकी 6 लाख 31 हजार 615 मालमत्ताधारकांनी 961 कोटी 74 लाख रुपयांचा मालमत्ताकर भरला. यापैकी 5 लाख 11 हजार 603 मालमत्ताधारकांनी तब्बल 697 कोटी 19 लाख रुपयांचे बिल ऑनलाईन माध्यमातून भरत डिजिटल सेवेचा लाभ घेतला.
करसंकलन विभागाकडून ऑनलाईन कर भरा मोहिमेअंतर्गत सवलती, एसएमएस सूचना, सोशल मीडिया मोहिमा तसेच, सार्वजनिक घोषणांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईनकर भरण्यास प्राधान्य दिले आहे.
महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना मालमत्तेची माहिती, थकबाकी, सवलतींचा तपशील तसेच, कर भरण्याची पावती डाउनलोड करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. नागरिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत असून, ऑनलाईन पेमेंट प्रणालीमुळे कर भरणे अधिक सुलभ झाले आहे.
...असा झाला मालमत्ताकर भरणा
ऑनलाईन-697 कोटी 19 कोटी लाख (72.49%)
धनादेश-119 कोटी 13 लाख (12.39%)
रोख-104 कोटी 87 लाख (10.90%)
डीडी- 7 कोटी 9 लाख (0.74%)
समायोजन : 33 कोटी 38 लाख (3.47 %)
ईडीसी : 6 लाख (0.01%)
ऑनलाईन सुविधेमुळे वेळ, श्रमांची बचत
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ताकर भरणा प्रक्रियेत सुलभता व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरास प्राधान्य दिले आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन माध्यमाचा स्वीकार केल्यामुळे घर बसल्या अधिक जलद पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ व श्रमांची बचत होत आहे. तसेच, सवलतही मिळत आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.