

संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही वर्षात सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. सकाळ-संध्याकाळ महिलांना लक्ष्य करून दागिने हिसकावण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या; मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने या घटनांमध्ये घट झाली आहे. यामागे पिंपरी-चिंचवड पोलिसांचे सुक्ष्म नियोजन आणि कठोर अंमलबजावणी कारणीभूत ठरल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
शहरातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर लक्ष
चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसोबतच शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर दररोज सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रांत नाकाबंदी सुरू केली. विशेष म्हणजे, चेन स्नॅचिंग ‘हॉटस्पॉट’ पॉइंट वेगळे निश्चित करून त्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्यात आले. स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांचा सक्रिय सहभाग या मोहिमेत आहे.
नियंत्रण कक्षाकडून फॉलोअप
नाकाबंदी लागल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याकडून मुख्य नियंत्रण कक्षाला (मेन कंट्रोल रूम) वायरलेसवरून माहिती दिली जाते. नियंत्रण कक्षाकडून वेळोवेळी अद्ययावत माहिती घेतली जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून देण्यात आली असून, कोणता अधिकारी कधी आणि कोणत्या नाकाबंदी ठिकाणी भेट देणार, याचे वेळापत्रक पोलिस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा, वाहतूक पोलिसांचाही सहभाग
गुन्हे शाखेकडून प्रत्येक नाकाबंदीसाठी एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस अंमलदार नियुक्त केले जातात. संबंधित पोलिस ठाण्यांकडून बॅरिकेड, दोर, लाठी व रजिस्टरची व्यवस्था केली जाते. तपासणीदरम्यान वाहनांची सविस्तर नोंद रजिस्टरमध्ये करण्यात येते. वाहतूक शाखेकडील प्रभारी अधिकारी प्रत्येक पॉईंटवर चलन मशीनसह एक वाहतूक अंमलदार नियुक्त करतात.
नाकाबंदीवर ‘लाईव्ह मॉनिटरिंग’
दररोजच्या कारवाईचा लेखी अहवाल मुख्य नियंत्रण कक्षाकडून मागवून वरिष्ठांना सादर केला जातो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर ‘लाईव्ह मॉनिटरिंग’ ठेवले जाते. चेन चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई, सातत्यपूर्ण नाकाबंदी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आणि नियंत्रण कक्षाची प्रभावी समन्वय यामुळे शहरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. एकंदरीतच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आखलेले मायक्रो प्लॅनिंग चेन चोरट्यांना रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.
उपायुक्त, सहायक आयुक्तांकडे जबाबदारी
सकाळच्या सत्रात संबंधित सहाय्यक पोलिस आयुक्त, तर सायंकाळच्या सत्रात संबंधित पोलिस उपायुक्त नाकाबंदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करतात. प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपल्या हद्दीत नाकाबंदी कोठे लावली आहे, याची माहिती नियंत्रण कक्षाला देतात.
संशयितांची कसून चौकशी
संबंधित पोलिस ठाण्याचे मार्शल नाकाबंदी ठिकाणी पेट्रोलिंग करत असतात. विशेषतः स्पोर्ट्स बाईक आणि पल्सर मोटारसायकली अनिवार्यपणे तपासून त्यांची नोंद केली जाते. संशयित वाहन किंवा व्यक्ती आढळल्यास त्यांची सखोल चौकशी केली जाते. संशयास्पद वाहनाची माहिती मिळताच मार्शल व टू-मोबाईल पथके तत्काळ पाठलाग करून कारवाई करतात. नंबर प्लेट नसलेल्या गाड्या, हेल्मेट/हुडी घालून किंवा रुमाल बांधून फिरणाऱ्या इसमांची विशेष तपासणी केली जाते. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तालय स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सकाळ व सायंकाळ नाकाबंदी, हॉटस्पॉट पॉईंटचे मॅपिंग, वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट देखरेख आणि नियंत्रण कक्षामार्फत दैनंदिन मॉनिटरिंग या उपाययोजनांमुळे चेन चोरीच्या वार्षिक घटनांमध्ये घट झाली आहे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड