

पिंपळे निलख: जगताप डेअरी चौक ते सांगवी फाटा दरम्यानच्या बीआरटी रोडलगत ट्रॅव्हल्स बस मोठ्या प्रमाणावर उभा असतात. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून, अपघाताचा धोका वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेषतः सायंकाळी 5 नंतर ट्रॅव्हल्स बसची मोठी वर्दळ सुरू होत असून, त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना अचानक थांबावे लागत आहे.
या परिसरात बस रस्त्याच्या कडेला थांबवल्या जात असल्याने मागून येणाऱ्या वेगवान वाहनांना अचानक बेक मारावा लागत आहे. परिणामी, दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ट्रॅव्हल्स चालकांकडून रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दररोज कोंडी होते, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तरीही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
या मार्गावर वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन ट्रॅव्हल्सला नियोजित ठिकाणीच थांबवण्याची सक्ती करावी. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी
कुमार खताळ, आयटी अभियंता
ट्रॅव्हल्सचालकांना विशेष थांबे नेमून दिले आहेत. या भागात मानकर चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, औंध हॉस्पिटल असे थांबे दिले आहेत. तरीसुद्धा असे रस्त्यावर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यामध्ये कारवाईसाठीची काही प्रोसेस आहे. त्यामध्ये ते बसत असतील तर आम्ही नक्की कारवाई करू
संतोष खैरे, वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल, सांगवी