Sinhagad Express Women Reserved Coach Demand: सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी
पिंपरी: पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागा न मिळाल्याने अनेक तिकीटधारक आरक्षित किंवा मासिक पासधारक डब्यांमध्ये प्रवेश करतात. तसेच, पासधारकांशी वाद घालतात. यामुळे अनेकदा भांडणाचे प्रकार घडतात. याचा त्रास मासिक पासधारक, विशेषतः महिलांना, सहन करावा लागत आहे. त्यामुळे मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र राखीव डबा देण्यात यावा, अशी मागणी पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत संघटनेने नुकतेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे. या वेळी संघटनेने डेक्कन क्वीन, प्रगती आणि सिंहगड एक्सप्रेस या गाड्यांमधील मासिक पासधारक डब्यांमध्ये नियमित तिकीट व पास तपासणी व्हावी, यासाठी सह्यांची मोहिमही राबवली. या सह्यांचे निवेदन मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस या गाड्या दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमानी, नोकरदार व व्यावसायिक प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरल्या आहेत, परंतु प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मासिक पासधारकांसाठी असलेल्या राखीव डब्ब्यामध्ये अन्य प्रवाशांकडून घुसखोरी केली जात आहे.
वाद आणि असुरक्षिततेचे वातावरण
जागा न मिळाल्याने अनेक तिकीटधारक आरक्षित किंवा मासिक पासधारक डब्यांमध्ये प्रवेश करतात. पासधारकांशी वाद घालतात. याचा त्रास मासिक पासधारक, विशेषतः महिलांना, सहन करावा लागत असल्याचे संघटनेने नमुद केले. पुणे-मुंबई मार्गावरील इतर सर्व गाड्यांमध्ये मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र डबे असताना सिंहगड एक्सप्रेस हा एकमेव अपवाद आहे. पहाटे पुण्याहून मुंबईकडे जाणारी ही पहिलीच गाडी असल्याने गर्दी प्रचंड असते. त्यामुळे महिलांची सुरक्षितता, प्रवास सुलभ करण्यासाठी वादाचे प्रकार टाळण्यासाठी सिंहगड एक्सप्रेसमध्ये तातडीने स्वतंत्र महिला डबा राखीव ठेवावा. तसेच, पूर्वीप्रमाणे किमान तीन जनरल डबे पुन्हा जोडावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
डब्यांची संख्या घटल्याने वाढली गैरसोय
कोरोनानंतर प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्यामुळे 22 मार्च 2022 पासून या गाड्या सुरू झाल्या, परंतु सिंहगड एक्सप्रेस (पूर्वी 19 नंतर 16 सध्या 14 डबे), डेक्कन क्वीन एक्सप्रेस (1 जनरल व 2 एस.एल.आर. डबे कमी) यामुळे अनारक्षित प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एकच जनरल डबा असल्याने उभे राहायलाही जागा मिळत नसल्याची स्थिती आहे.

