

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. पदासाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळावी, यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष, खासदार, आमदार तसेच राज्यातील नेतेमंडळींची मनधरणी केली जात आहे.
महापालिकेत यंदा 10 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार आहे. त्यात सत्तारूढ भाजपाचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या 3 जागा आहेत. त्यासाठी अनेकांची मोर्चेबांधणी केली जात आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, निवडणुकीत माघार घेणारे, माजी नगरसेवक, पराभूत नगरसेवक तसेच, विविध क्षेत्रातील मंडळी या पदासाठी इच्छुक आहेत. भाजपातील अनेक निष्ठावंतांनी या पदावर दावा सांगितला आहे.
भाजपाच्या इच्छुकांकडून पद मिळावे, म्हणून आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे मनधरणी करण्यात येत आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतर मंत्र्यांकडे त्यासाठी शब्द टाकला जात आहे. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्त्या असल्याने संधी द्यावी, अशी विनंती केली जात आहे. वेगवेगळ्या माध्यमातून नेतेमंडळींकडे आपल्या नावासाठी गळ घातला जात आहे. शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रयत्न चालविले आहेत. ती नावे प्रदेशाध्यक्षांकडून अंतिम केली जाणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासकडेही इच्छुकांची संख्या वाढली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे अनेकांनी या पदासाठी मागणी केली आहे. मात्र, नावे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अंतिम करणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पदासाठी मोठ्या रकमेच्या ऑफर ?
स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहरात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अनेक इच्छुक आपली निवड झाल्याचे सोशल मीडियवार घोषित करून टाकत आहे. त्या पदाला महत्व आल्याने अनेक जण मोठमोठ्या रकमेच्या ऑफर देत आहेत. त्यासाठी पैश्यांची बँग काहींनी तयार ठेवल्या आहेत. त्यामुळे या पदावरुन राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे, असे एका पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितले.
राष्ट्रवादी काँग््रेासमध्येही चढाओढ
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून तीन जणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. त्यासाठी पक्षात चढाओढ दिसत आहे. पराभूत नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, वसंत बोराटे, मयूर कलाटे, सीमा सावळे हे स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, आशा शेडगे, फजल शेख यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत.
उमेदवारी अर्जासाठी एनओसी आवश्यक
महापालिका निवडणुकीत उमेदवारांना महापालिकेसह इतर विभागांची थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावी लागत होती. त्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांना अर्ज भरताना थकबाकी नसलेली एनओसी घेणे आवश्यक आहे. मालमत्ताकर, पाणीपट्टी, वीजबिल तसेच, इतर विभागांची थकबाकी नसल्याची एनओसी त्यांना सादर करावी लागणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या नगर सचिव विभागाने संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत.
भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी
महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे स्वीकृत नगरसेवकपद मिळावे म्हणून अनेक जण खटाटोप करीत आहेत. भाजपाचे सात स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. पराभूत नगरसेवक उषा ढोरे, विलास मडिगेरी, नामदेव ढाके, चंद्रकांत नखाते, सिद्धेश्वर बारणे तसेच, महेश कुलकर्णी, राजू दुर्गे, सचिन साठे, राजेश पिल्ले, ऋषिकेश वाघेरे, अमोल थोरात, सचिन काळभोर, विशाल वाळुंजकर यांच्यासह अनेक जण स्वीकृत नगरसेवकासाठी इच्छुक आहेत. त्यात बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, शिक्षण व इतर क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश आहे.