

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच, खुल्या (ओपन) गटातील या सर्व राखीव ९३ जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेसाठी आरक्षण सोडत १० नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्या प्रभागात महिला आरक्षण पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेच्या ४ सदस्यीय ३२ प्रभागांची रचना ६ ऑक्टोबरला अंतिम झाली आहे. त्यात एकूण १२८ जागा आहेत. ही प्रभाग रचना अंतिम करताना सहा प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसंख्येसह एस.सी. व एस.टी. लोकसंख्येची आकडेवारी बदलल्याने त्या वर्गाच्या आरक्षणात बदल झाले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रभागातील आरक्षण कसे असणार यावर इच्छुक व माजी नगर-सेवकांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांचे डोळे आरक्षण सोडतीकडे लागले होते.
अखेर, राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत घेण्याचे वेळापत्रक सोमवार (दि. २७) जाहीर केले आहे. त्यामध्ये एस.सी. च्या २०. एस. टी. च्या ३ जागा अशा एकूण २३ आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत्त देण्यात आली आहे. सोडतीची जाहीर सूचना ८ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. तर आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी ११ नोव्हेंबरला पाठव्याचा म्हणजेच १० नोव्हेंबरला सोडत घ्यावी लागणार आहे.
१२८ पैकी ९३ जागा आरक्षित
एस.सी. च्या २०, एस. टी. च्या ३ जागेनंतर ओबीसीसाठी ३५ जागांवर तसेच, खुल्या गटातील ३५ जागांवर महिलांचे आरक्षण पडणार आहे. प्रभागातील अ, ब, क आणि ड या चार जागा कोणाला सुटणार, एकूण १२८ पैकी महिलांसाठी कोणत्या प्रभागातील जागा सुटणार, याबाबत इच्छुकांसह माजी नगरसेवक व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. राखीव जागेवरील खुल्या गटात पुरुषांना लडता येते; मात्र खुल्या गटातील जागेवर पुरुषांसोचत महिलांनाही लढता येते. त्यामुळे सर्व ३२ प्रभागाचे चित्र सोडतीनंतर अधिक स्पष्ट होणार आहे.
एस. सी. साठी या २० प्रभागांत असणार एक जागा आरक्षित
एस. सी. प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १९, १३, २०, २५, २३, २०, ९, ११, १६, २१. १०, ३२, २९, २७, ३१, २६, ८, ४, १७ आणि ३ या एकूण २० प्रभागात आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे. एस. सी. लोकसंख्येनुसार या प्रभागातील एका जागेवर महिला किंवा पुरूष एस. सी. प्रवगचि आरक्षण पडू शकेल. या २० पैकी १० जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत, प्रभाग क्रमांक ४, २९ आणि ३० या तीन प्रभागांत एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. त्यातील दोन जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. या प्रवर्गात पुरुषांसाठी केवळ एक जागा राखीव असणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार आरक्षण सोडत काढणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित मुदतीत आरक्षण सोडत घेण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या जातात. महापालिका शाळेतील विद्याथ्यांकडून पारदर्शक ड्रममधून चिठ्ठी काढली जाते. त्यानुसार त्या प्रभागात महिला व पुरुष असे आरक्षण निश्चित केले जाते. यंदा आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना स्वीकारण्यात येणार आहेत. आरक्षण सोडतीची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी मनुष्यबळ नेमण्यात येत आहे, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
असे आहे आरक्षण
वर्ग एकूण जागा पुरूष महिला
अनुसूचित जाती (एससी) २० १० १०
अनुसूचित जमाती (एसटी) ०३ ०१ ०२
इतर मागास वर्ग (ओबीसी) ३५ १७ १८
सर्वसाधारण (ओपन) ७० ३६ ३४
एकूण १२८ ६४ ६४
शहराची लोकसंख्या
(२०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण लोकसंख्या-१७लाख २७ हजार ६९२
अनुसूचित जाती लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८२०
अनुसूचित जमाती लोकसंख्या ३६ हजार ५३५