

शशिकांत शिंदे
सांगली: यंदा जिल्ह्याच्या बहुतेक भागात मे महिन्यापासूनच पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. त्याचा फटका द्राक्षशेतीला बसला आहे. जिल्ह्यात सुमारे 80 हजार एकर क्षेत्रांत द्राक्षबागा आहेत. त्यापैकी 60 ते 70 टक्के द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्या असून, उत्पादनात सरासरी 50 टक्केघट आहे. त्यामुळे पुढीलवर्षी द्राक्षाचे उत्पादन पर्यायाने बेदाण्याचे उत्पादनही घटणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. (Latest Pimpri chinchwad News)
जिल्ह्यात गेली चार वर्षे अतिवृष्टी होत आहे. संपूर्ण शेती, शेतकरी अडचणीत आहे. यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला गारपीट होऊन तासगाव, मिरज, जत, खानापूर, पलूस व वाळवा तालुक्यात अतिवृष्टी झाली. द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणी / खरड छाटणीपासून साधारणतः 40 ते 60 दिवसांच्या कालावधीत काडीवरील डोळ्यामध्ये सुप्त अवस्थेत सूक्ष्म घड निर्मिती होत असते. त्यासाठी कडक ऊन असण्याची आवश्यकता असते.
परंतु, याच काळात जिल्ह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झालेले आहे. खरड छाटणीनंतर काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घड निर्मिती होण्यासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तसेच बागेत सतत पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्षबागांच्या मुळ्या कुजून गेल्या. मुळ्या निष्क्रिय झाल्यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे.
घड निर्मितीवर परिणाम
जिल्ह्यात आतापर्यंत 60 ते 70 टक्के क्षेत्रातील द्राक्षबागांची छाटणी झाली. अनेक शेतकऱ्यांच्या बागांना द्राक्षपीक आलेले नाही. अनेकांच्या द्राक्षबागांत 50 टक्केच घड दिसून येत आहेत. परतीच्या पावसाचा जोर आणि ढगाळ हवामान यामुळे द्राक्षबागांच्या छाटणीचे नियोजन कोलमडले आहे.