

गुणवत्ता यादीत सुधारणा करण्याचा ‘एफटीआयआय’ प्रशासनाकडून निर्णय
पुणे : ‘फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने केला होता. संघटनेच्या विद्यार्थी प्रतिनिधींसमवेत ‘एफटीआयआय’च्या प्रशासनाची सोमवारी (दि. 27 ) बैठक झाली. त्यानंतर ‘एफटीआयआय’ने आता गुणवत्ता यादीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार नाही’, असे स्पष्टीकरण निवेदनाद्वारे दिले आहे.(Latest Pune News)
‘एफटीआयआय’च्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाला असल्याचा आरोप करण्याबरोबरच प्रशासनाने 17 ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचा दावाही एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने केला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि. 24 ) प्रवेशासाठीची सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली, मात्र, या यादीतही त्रुटी असल्याचे आढळले. स्क्रीन ॲक्टिंग या अभ्यासक्रमातील जागा 16 वरून 23 करण्यात आल्या आहेत, त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी असलेल्या आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला होता.
प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवावी, पहिली फेरी आणि दुसऱ्या फेरीचा तातडीने निकाल जाहीर करावा, प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश प्रशासकीय मंडळात करावा, अशा मागण्या विद्यार्थी संघटनेने केली. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत सोमवारी (दि. 27) प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीनंतर एफटीआयआय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गुणवत्ता यादीत त्रुटी असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे स्पष्टीकरण एफटीआयआय प्रशासनाने दिले.