

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 नंतर तब्बल 9 वर्षांनंतर होत आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.15) मतदान होत असून, महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतील 2 हजार 67 मतदान केंद्रे मतदानासाठी तयार आहेत. मतदारांचा कौल सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे. मतमोजणी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.16) होणार आहे.
चार सदस्यीय एकूण 32 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. महापालिकेच्या शाळा तसेच, खासगी शैक्षणिक संस्थांच्या इमारतींमध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी आज मतदान केंद्राध्यक्षांसह कर्मचाऱ्यांना विविध आठ केंद्रांवरून साहित्य वितरण करण्यात आले. पीएमपीएल बसने सर्व कर्मचारी ईव्हीएम मशिनसह इतर साहित्य घेऊन मतदान केंद्रावर पोहचले. त्यांनी सायंकाळपर्यंत मतदान केंद्र तयार केले. महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या संकल्पनेवर काही मतदान केंद्र सजविण्यात आले आहेत. तसेच, तेथे मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी आहे. शहरात तब्बल 17 लाख 13 हजार 891 मतदार असून, मतदानासाठी एकूण 2 हजार 67 मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. सायंकाळी उशीरा सर्व मतदान केंद्रांवरील 128 पैकी 126 जागांसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनेचे तसेच, बंडखोर व अपक्ष उमेदवार असे 697 जणांचे नशीब ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे.
दरम्यान, फेबु्रवारी 2017 ला झालेल्या निवडणुकीत 11 लाख 92 हजार 89 पैकी 7 लाख 79 हजार 60 जणांनी मतदान केले. तब्बल 65.35 टक्के मतदान झाले होते. नऊ वर्षांतनंतर होत असलेल्या यंदाच्या निवडणुकीत किती मतदान होते, याकडे लक्ष लागले आहे. त्यावरुन अनेकांच्या विजयाचे गणित ठरणार आहे. दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महापालिकेच्या स्वीप कक्षाकडून शहरभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करुन, लोकशाहीतील आपला पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
केंद्रांवर वैद्यकीय पथक
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टर नेमण्यात आले आहेत. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, प्रतिक्षा कक्ष तसेच, प्रथमोपचार पेटीसह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच, स्वच्छतागृहाची सोय केली आहे. काही केंद्रावर महिलासाठी स्तनपान कक्ष उभारला आहे.
कंट्रोल रुमद्वारे लक्ष
भयमुक्त व निकोप वातावरणात मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस यंत्रणेने केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विविध पथकांद्वारे देखील पोलिस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. मतदान केंद्र तसेच, इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे. मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
केंद्रावर मतदारांना मोबाईल नेण्यास बंदी
बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन मतदारांना स्लिपांचे वाटप करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मतदान केद्रांमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय सर्व मतदान केंद्रावर स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आठ ठिकाणांहून केंद्रांवर पोहचले साहित्य
शहरातील आठ ठिकाणांहून मतदान साहित्य व मतदान केंद्रावरील पथके सुरक्षितपणे आपापल्या 2 हजार 67 मतदान केंद्रांवर पोहोचली आहेत. तब्बल 10 हजार 335 कर्मचारी यांसह सुरक्षा विभागातील कर्मचारी, शिपाई, मजूर यांसह पथके मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर मतदान साहित्य, ईव्हीएम मशिन, मतदानासाठी लागणारे कागदपत्रे, सीलबंद साहित्य व अन्य आवश्यक सामग्री घेऊन सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. मतदान पथकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिस प्रशासन, वाहतूक विभाग तसेच, संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केले आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सुविधा
मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची सुविधा तसेच, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण 453 व्हीलचेअर क्षेत्रीय कार्यालयनिहाय देण्यात आले आहेत. ज्या मतदान केंद्रांवर 10 पेक्षा अधिक खोल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, मोरवाडी व कासारवाडी आयटीआय, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, महात्मा फुले महाविद्यालय, सिम्बॉयोसिस महाविद्यालय, भैरवनाथ महाविद्यालयाचे एनएसएसचे विद्यार्थी, लाईट हाऊस प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका आणि सक्षमा प्रकल्पाअंतर्गत कार्यरत महिलांची मतदान केंद्रांवर नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवरील गर्दी व्यवस्थापन व मतदारांच्या रांगा नियोजित पद्धतीने लावण्यासाठी एनएसएसचे विद्यार्थी व इतर स्वयंसेवी संस्था मदत करणार आहेत, अशी माहिती उपायुक्त ममता शिंदे यांनी दिली.
मतदार यादीत असे नाव शोधा
शहरातील नागरिकांना मतदार यादीमधील आपले नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लािलळपवळर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदारांना मतदार यादी मधील भाग क्रमांक व अनुक्रमांक या बरोबरच मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता या सर्च सुविधेद्वारे उपलब्ध होतो. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मतदार नाव शोधणे (सर्च व्होटर लिस्ट) या लिंकवर, सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सारथी हेल्पलाइन (8888006666) या क्रमांकावर संपर्क साधल्यास मतदान केंद्रांची माहिती दिली जाते. आजअखेर 39 हजार 356 जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
शहरात 17 लाख 13 हजार 891 मतदार
शहरात एकूण मतदार संख्या 17 लाख 13 हजार 891 आहे. त्यामध्ये 9 लाख 5 हजार 728 पुरुष, 8 लाख 7 हजार 966 महिला आणि 197 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 16 हा 75 हजार 105 मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग आहे. तर, प्रभाग क्रमांक 23 मध्ये सर्वात कमी म्हणजे 33 हजार 33 मतदार आहेत.
मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर
शहरातील 2 हजार 67 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यासाठी वेब कास्टिंग सुविधा उभारण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मिळून तब्बल 4 हजार 528 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी येथील महापालिका भवनामध्ये वॉर रुम उभारण्यात आला आहे. प्रत्येक केंद्राच्या आतमध्ये 1 व बाहेर 1, इमारतीच्या प्रवेशद्वारावर 1 असे एकूण 4 हजार 528 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण महापालिकेत उभारण्यात आलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील वॉर रुमद्वारे केले जाणार आहे. या वॉर रुममध्ये नोडल अधिकारी तथा सहशहर अभियंता अनिल भालसाखळे यांच्यासह सहाय्यक नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता महेश कावळे, बाळू लांडे, संतोष दुर्गे यांच्यासह 2 उपअभियंते व 8 कनिष्ठ अभियंते कार्यरत राहणार आहेत.
2 हजार 67 मतदान केंद्रे
मतदारांच्या सोयीसाठी शहरभरात एकूण 2 हजार 67 मतदान केंद्रे तयार करण्यात आले आहेत. तात्पुरत्या स्वरूपातील एकूण 322 मतदान केंद्र आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय त्याची संख्या निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक एकअंतर्गत 52, कार्यालय क्रमांक दोनअंतर्गत 54, कार्यालय क्रमांक तीनअंतर्गत 3, कार्यालय क्रमांक चारअंतर्गत सर्वाधिक 108, कार्यालय क्रमांक पाचअंतर्गत 27, कार्यालय क्रमांक सहाअंतर्गत 22, कार्यालय क्रमांक सातअंतर्गत 23 तसेच कार्यालय क्रमांक आठअंतर्गत 33 तात्पुरती मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
मुक्त, निर्भय, पारदर्शक वातावरण मतदान प्रक्रिया
मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करावे. मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.