

पिंपरी: ट्रकच्या धडकेत दुचाकी वर जाणाऱ्या दोन बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ घडली. ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (२०, रा. पुनावळे) असे मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. ट्रक चालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा आणि ऋतुजा दुचाकीने प्रवास करत होत्या. दरम्यान, काळेवाडी येथे भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.