

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. शहरातील महापालिका व खासगी शाळांच्या इमारतींमध्ये एकूण 2 हजार 67 मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. त्यासाठी मतदान केंद्राध्यक्षांना विविध आठ केंद्रांवरून बुधवारी (दि.14) साहित्य वाटप केले जाणार आहे. वाहतुकीसाठी पीएमपीएल बस व इतर वाहनांची सोय करण्यात आली आहे.
महापालिकेसाठी 32 प्रभागांत 128 जागा आहेत. प्रभाग क्रमांक 6 व 10 मधून अनुक्रमे भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 126 जागांसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण 10 हजार 335 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील महापालिका व खासगी शाळा इमारतींत 2 हजार 67 मतदान केंद्रे स्थापित करण्यात आले आहेत. त्यासाठी एकूण 7 हजार 149 मतदान मशिन (ईव्हीएम-बॅलेट युनिट) आणि 2 हजार 900 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान केंद्र परिसरात मंडप, विद्युत प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच, स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. केंद्रांच्या बाहेर वाहनांसाठी पार्किंगची सोय केली आहे. दिव्यांगासाठी रॅम्प तसेच,व्हीलचेअरची सोय केली आहे. काही केंद्र नवीन संकल्पनेवर सजविण्यात आली आहेत. तसेच, छायाचित्र घेण्यासाठी सेल्फी पॉईटही करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांबाहेर यादीतील नाव शोधून देण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मतदान करताना ओळखपत्र आवश्यक
मतदान करण्यासाठी मतदारांकडे ग्राह्य असलेले छायाचित्रासह असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. निवडणूक विभागाने दिलेले मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 12 प्रकारचे ओळखपत्रांचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. भारताचा पासपोर्ट, आधारकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, केंद्र शासन/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयकृत बँका किंवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रासह अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड), निवृत्त कर्मचाऱ्यांची किंवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्तींची छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र), लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालय तसेच, विधानसभा किंवा विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड.
एकाला चार मते द्यावी लागणार
महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना आहे. शहरात एकूण 32 प्रभाग आहेत. एका मतदाराला चार मते द्यावी लागतात. अ, ब, क आणि ड या चार जागेवरील प्रत्येकी एका उमेदवाराला मत देणे आवश्यक आहे. चार मते दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यासाठी सर्व चार जागेवरील एका उमेदवाराला मते देणे बंधनकारक आहे. सुरुवातीच्या अ जागेसाठीच्या उमेदवारांसाठी पांढरा रंगाचा बॅलेट पेपर आहे. दुसऱ्या क्रमाकांवरील ब जागेवरील उमेदवारांसाठी फिका गुलाबी रंगाचा बॅलेट पेपर आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावरील क जागेवरील उमेदवारांची नावे फिका पिवळा रंगाच्या बॅलेट पेपरवर आहेत. सर्वांत शेवटी असलेल्या ड जागेवरील उमेदवारांची नावे फिका निळा रंगातील बॅलेट पेपरवर आहेत. मतदारांना नोटाला (वरील एकही पसंत नाही) मत देण्याचा पर्यायही ईव्हीएमच्या बॅलेट पेपरवर उपलब्ध आहे.
मतदान केंद्रांसाठी साहित्य कीटचे आज सकाळपासून वाटप
मतदान केंद्रांकरिता साहित्याचे कीट तयार करण्यात आले आहेत. त्या कीटचे वाटप प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 19 साठी निगडीतील हेडगेवार भवन, प्रभाग क्रमांक 16, 17, 18, 22 साठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर, प्रभाग क्रमांक 2, 6, 8, 9 साठी इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, प्रभाग क्रमांक 25, 26, 28, 29 साठी रहाटणीतील ड क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 7 साठी भोसरीतील कबड्डी प्रशिक्षण संकुल, प्रभाग क्रमांक 1, 11, 12, 13 साठी चिखली येथील घरकुल टाऊन हॉल, प्रभाग क्रमांक 21, 23, 24, 27 साठी थेरगाव येथील शंकर गावडे कामगार भवन आणि प्रभाग क्रमांक 20, 30, 31, 32 साठी कासारवाडी भाजी मंडई येथून केले जाणार आहे. त्यासाठी त्या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठी लागणारे साहित्य तसेच, कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एकूण 521 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात पीएमपीएल बसचाही समावेश आहे.
दुबार मतदान होण्याची शक्यता
पिंपरी-चिंचवड शहरातील मतदार यादीत तब्बल 92 हजारांपेक्षा अधिक दुबार मतदार आहेत. या मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार येथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास त्या मतदार यादीत तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला जाणार आहे. या व्यतिरिक्त अनेक मतदारांची दुबार नाही यादीत आहेत. त्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात असल्याने यादीवर घोळ होण्याची शक्यता आहे. अशा मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागू शकते. त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सात शहराध्यक्षांच्या अस्तित्वाची बाजी
निवडणुकीत विविध सात राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष स्वत: उमेदवार आहेत. संत तुकारामनगर, कासारवाडी, विशाल थिएटर प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल पुन्हा निवडणूक आखाड्यात आहेत. ते माजी महापौर आहेत. तसेच, त्यांनी सत्तारूढ पक्षनेते व माजी विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे. ते सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे उमेदवार आहेत. ते तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. निगडी, यमुनानगर प्रभाग क्रमांक 13 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तिसऱ्यांदा लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड प्रभाग क्रमांक 26 मधून लढत आहेत. ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) शहरप्रमुख नीलेश तरस हे रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 येथून पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आहेत. वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 25 मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर हे ही पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. पिंपळे निलख, कस्पटेवस्ती, वाकड प्रभाग क्रमांक 26 मधून आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे हे ही पहिल्यांदा निवडणूक रणसंग्रामात उतरले आहेत. कोणता शहराध्यक्ष विजयी होऊन महापालिका सभागृहात यशस्वी कर्णधार म्हणून प्रवेश करतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सात माजी महापौर मैदानात
माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे भाजपाकडून सांगवी प्रभाग क्रमांक 32 मध्ये क जागेवर लढत आहेत. माजी महापौर राहुल जाधव भाजपाकडून जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी प्रभाग क्रमांक 2 क या जागेवर लढत आहेत. माजी महापौर नितीन काळजे भाजपाकडून मोशी, चऱ्होली, डुडुळगाव प्रभाग क्रमांक 3 ब या जागेवर उमेदवार आहेत. माजी महापौर वैशाली घोडेकर या नेहरुनगर, खराळवाडी, अजमेरा कॉलनी प्रभाग क्रमांक 9 ब या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर अपर्णा डोके या चिंचवड, केशवनगर प्रभाग क्रमांक 18 अ जागेवर भाजपाच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर तथा शहराध्यक्ष योगेश बहल हे संत तुकारामनगर, कासारवाडी, विशाल थिएटर प्रभाग क्रमांक 20 ड मधून उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर शकुंतला धराडे या सुदर्शननगर, पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 ब जागेवर भाजपाच्या उमेदवार आहेत.
तीन जोडपे रिंगणात
निवडणुकीत यंदा वेगवेगळ्या तीन प्रभागांतून पती व पत्नी असे जोडपे रिंगणात आहेत. निगडी, यमुनानगर प्रभाग क्रमांक 13 मधील दोन गटामधून मनसेने शहराध्यक्ष सचिन चिखले आणि माजी नगरसेविका अश्विनी चिखले हे मैदानात आहेत. रावेत, मामुर्डी, किवळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व त्यांच्या पत्नी जयश्री भोंडवे हे दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात आहे. पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल काटे हे दुसऱ्यांदा निवडणूक मैदानात आहेत. हे एकाच कुंटुंबातील सहा उमेदवार जोडीने महापालिका सभागृहात प्रवेश करणार का, याचा फैसला शुक्रवारी (दि.16) होणार आहे.