

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अखेर, जाहीर झाली आहे. तब्बल 40 ते 75 हजार मतदार संख्या असलेल्या प्रभागात पोहचण्यासाठी प्रचारासाठी अल्प मुदत देण्यात आली आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्यास आठवड्याभरातच सुरूवात होणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीस सामोरे जाण्याच्या तयारीसाठी कमी कालावधी असल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे.
निवडणुका लांबणीवर पडणार असे चित्र निर्माण झाल्याने माजी नगरसेवक व इच्छुक काहीसे गाफील झाले होते; तसेच राजकीय पक्षांकडून कासवगतीने अर्ज स्वीकृती व मुलाखतीचे कामकाज सुरू होते. राज्य निवडणूक आयोगाने सोमवार (दि. 15) महापालिका निवडणूक जाहीर केल्याने इच्छुक, माजी नगरसेवकांसह राजकीय पक्ष पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करुन प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यासाठी पक्ष कार्यालयासह कोअर कमिटीची लगबग सुरू झाली आहे. निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर सोमवारी सायंकाळनंतर बैठकांचे सत्र सुरू होऊन मुलाखती पूर्ण करून संभाव्य उमेदवार यादी निश्चित करण्याच्या कामकाजाला कोअर कमिटीकडून सुरूवात करण्यात आली आहे.
तर, इच्छुकांकडून शहराध्यक्षांसह खासदार, आमदार, प्रदेशाध्यक्ष, वरिष्ठ नेत्यांकडे आपल्या नावांची शिफारस करण्यास वेग आला आहे. पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन आपली उमेदवारी फायनल करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी माध्यमे तसेच, राजकीय अस्त्रांचा वापर केला जात आहे. तसेच, पक्षांतर करुन दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असलेले अनेक इच्छुक वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांतील गणिते बदलणार आहेत. या सर्व घडामोडींना वेग आला आहे.
महाविकास आघाडीत जागांबाबत उत्सुकता
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत लढणार असे सध्याचे चित्र आहे. आघाडी झाल्यास प्रभागातील सर्व उमेदवार हे एका पक्ष चिन्हावर निवडणूक रिंगणार उरतणार आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्व चार उमेदवार एका पक्षाची असतील. हा निवडणूक फॉर्म्युला अंतिम झाल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यात कोणत्या पक्षाला कोणता प्रभाग सुटणार याची उत्सुकता लागली आहे.
महायुती नाही
भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत महायुती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व 128 जागांवर उमेदवार दिले जाणार आहे. काही जागा मित्रपत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला सोडला जाणार आहेत. मात्र, त्या पक्षाचे उमेदवार भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढणार आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे पक्ष स्वतंत्र्यपणे लढणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत महायुतीतील सर्वच पक्ष स्वबळावर लढताना दिसणार आहेत.
अर्ज स्वीकृती, मुलाखतीस वेग
उमेदवार अर्ज स्वीकारण्यास येत्या मंगळवार (दि.23) पासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन यादी अंतिम करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. भाजपाकडून एकूण 650 उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत. उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्या मुलाखती मंगळवार (दि. 16) पासून घेण्यात येणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वात सुरूवातीला अर्ज घेण्यास सुुरूवात झाली आहे. त्या पक्षाकडे 300 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार (दि. 16) पासून स्वत: अजित पवार हे घेणार आहेत. त्या दृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रविवार (दि. 21)पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत एकूण 190 अर्ज प्राप्त झाले आहेत. खासदार श्रीरंग बारणे हे लवकरच त्यांच्या मुलाखती घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 100 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यापेक्षा अधिक जण इच्छुक आहेत. संभाव्य उमेदवारांची यादीही तयार करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे यादी अंतिम करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 130 हून अधिक इच्छुकांनी मुलाखत दिल्या आहेत. लवकरच पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारांची नावांची यादी जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाकडे 250 पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. पक्षाने सर्व 128 जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीकडून उमेदवारी यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सर्व प्रभागात मनसेकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षानेकडूनही उमेदवार अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. पक्षाने भाजपाकडे 15 जागांची मागणी केली असून, त्यानुसार सक्षम उमेदवार तयार केल्याचा पक्षाचा दावा आहे. आम आदमी पार्टी सर्व 128 जागांवर उमेदवार देणार आहे. पक्षाने सर्वांत प्रथम 15 उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पाटी आणि इतर पक्ष तसेच, संघटनांकडून इच्छुकांकडून अर्ज घेण्यात येत आहेत. तसेच, मुलाखतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.