

तळेगाव दाभाडे: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांभोवती प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या कामांची सद्यःस्थिती तसेच तळेगाव- चाकण -शिक्रापूर महामार्गाच्या कामांचा अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी (दि. 12) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे सविस्तर माहिती मागितली होती. या दोन्ही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूककोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असल्याने या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर असून, त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्यास किमान तीन महिने लागतील. प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
महामार्ग प्रकल्प रखडल्याने वाहतूक कोंडी
आमदार सुनील शेळके यांनी सांगितले, की तळेगावचाकणशिक्रापूर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असून, एमआयडीसी क्षेत्रातील हजारो कामगार, उद्योगपती, वाहतूकदार दररोज या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था, खड्डे, अरुंद पट्टे आणि वाढलेली वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर असून, त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्यास किमान तीन महिने लागतील. प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
तात्पुरत्या उपाययोजनांची ठाम मागणी
तोपर्यंत नागरिकांनी त्रास सहन करावा लागणार का, असा सवाल उपस्थित करत आमदार शेळके यांनी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. अस्तित्वातील रस्त्याच्या ताब्यातील जागेचा वापर करून बाजूपट्ट्यांसह रस्त्याचे मजबुतीकरण करता येईल का? खड्डे बुजवणे, छेद रस्त्यांवर सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संकेत फलक आणि प्रकाशयोजना त्वरित करता येतील का? असे प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केले.
रिंगरोड प्रकल्पाची प्रगती
या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंगरोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की पुणे रिंगरोडच्या पश्चिम विभागातील कामे मे 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पूर्व विभागातील कामे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर पुणेपिंपरी चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी होणार असून, बाह्य वाहतूक थेट रिंगरोडवर वळवता येणार आहे.
तात्पुरत्या उपाययोजनांवर विचार
मंत्री भुसे यांनी पुढे सांगितले, की तळेगावचाकणशिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना शक्य आहेत का, याची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करून आवश्यक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
औद्योगिक व नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या
या चर्चेमुळे मावळ, चाकण, शिक्रापूरसह संपूर्ण पुणे महानगर परिसरातील उद्योग, वाहनचालक व नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दीर्घकालीन प्रकल्पांसोबतच तातडीच्या उपाययोजना झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन दैनंदिन प्रवास सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तळेगाव-चाकण महामार्ग प्रकल्प ठळक मुद्दे
तळेगाव ते चाकणदरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चार पदरी उन्नत रस्त्याचे बांधकाम
चाकण ते शिक्रापूर टप्प्यात विद्यमान भू-स्तरीय महामार्गाचे सहा पदरी रुंदीकरण
संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3,923.89 कोटी
महामार्ग अपग्रेडेशनसाठी बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (बीओटी) मॉडेलचा अवलंब
जमीन अधिग्रहणासाठी राज्य सरकारकडून आगाऊ निधी उपलब्ध करून देण्यात येणार
औद्योगिक, व्यापारी व दैनंदिन वाहतुकीसाठी वेगवान व सुरक्षित प्रवासाची सुविधा
एमआयडीसी, औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक ताण कमी होण्याची अपेक्षा