

हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे दोन्ही शहरे गतिमान मेट्रोसेवेने आणखी जवळ आली आहेत. त्यामुळे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या लाखांच्या घरात गेली असून, सकाळी तसेच सायंकाळी प्रवासासाठी गर्दी होत असल्याने ज्येष्ठांना बसण्यास जागाच मिळत नाही. मेट्रोमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव जागा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांकडून मेट्रोमध्ये राखीव जागा ठेवण्याची मागणी केली जात आहे.
पिंपरी- चिंचवडनगरी ही औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. झपाटयाने विकास झालेल्या शहरात आयटीयन्स, विद्यार्थी, शिक्षण व नोकरीनिमित्त अनेक जण स्थायिक झाले आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे तीस लाखांच्या घरात आहे. पिंपरी ते सिव्हील कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉलपर्यंत विस्तारित मेट्रो सुरू झाली आहे. पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी, (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, असे एकूण सहा थांबे आहेत. मात्र, वाढलेल्या गर्दीमध्ये प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागत असून, ज्येष्ठांना कोणी बसण्यासाठी जागा देत नसल्याचे वास्तव मेट्रोमध्ये दिसून येते. त्यामुळे ज्येष्ठांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येते.
सतत होणारी वाहतूककोंडी, पीएमपी बसचे अनियोजित वेळापत्रक, बसची कमतरता यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पुणे शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून पुणे शहरात नोकरीनिमित्त जाणाऱ्या नागरिकांची वाहतूककोंडीतून काही प्रमाणात सुटका झाली आहे. सुमारे एक ते दीड तासांच्या प्रवासाचा कालावधी आता फक्त अर्ध्या तासावर आला आहे. त्यामुळे नोकरदार तसेच कामानिमित्त पुण्यात जाणाऱ्यांची मेट्रो प्रवासाला गर्दी वाढत आहे.
ज्येष्ठ महिला, पुरुषांना मेट्रो प्रवासात इतर प्रवाशांनी बसण्यासाठी जागा देण्याबाबत प्रशासनाकडून नेहमी आवाहन केले जाते. तसेच ज्येष्ठांना प्रवासात राखीव जागेबाबतच्या सूचना आल्यास त्याबाबत विचार केला जाईल.
चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क आधिकारी
महिला, पुरुष, विद्यार्थी, नोकरदार यांचा कल वाढत आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकही मेट्रो प्रवासाला पसंती देत आहेत. मेट्रो प्रवास जलद, सोयीस्कर, सुरक्षित, वेगवान असल्याने ज्येष्ठांचा प्रतिसाद वाढला आहे. मात्र, मेट्रोमध्ये ज्येष्ठांना बसण्यासाठी राखीव जागा नसल्याने त्यांना गर्दीच्यावेळी उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे.
मेट्रो सुरु झाल्यापासून मी पीएमपीने प्रवास टाळते. गर्दी तसेच वाहतूककोंडीमुळे प्रवास करणे जिकीरीचे होते. वयोमानानुसार शारीरिक व्याधींमुळे उभे राहून प्रवास शक्य होत नाही. त्यामुळे मी सध्या मेट्रोने प्रवासाला प्राधान्य देते. मात्र, मेट्रो प्रवासादरम्यान बसण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने मेट्रो प्रशासनाने ज्येष्ठांसाठी जागा राखीव ठेवाव्यात.
सुलक्षणा कदम, ज्येष्ठ महिला
मेट्रोमुळे कोणताही त्रास न होता प्रवास सुरळीत होतो. ऑपरेशन झाल्यामुळे रिक्षा व बसने प्रवास टाळतो. मात्र, मेट्रो प्रवासात गर्दीच्यावेळी बसण्यास जागा मिळत नसल्याने प्रशासनाने ज्येष्ठांसाठी राखीव जागेचा विचार करावा.
जगदीश कदम, ज्येष्ठ नागरिक