

नवलाख उंबरे: सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना फसविण्याचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका गंभीर प्रकारामध्ये आता ई-चलनच्या नावाखाली सायबर फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अनेक सायबर तक्रारींमध्ये मागील वर्षभरामध्ये तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिस ठाण्यात शंभर पेक्षा अधिक नागरिकांचे तक्रार अर्ज दाखल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मोबाईलमधील वैयक्तिक माहिती केली जाते हॅक
अलीकडे अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लिंक पाठवली जात आहे. या लिंकमध्ये तुमच्या वाहनाचे ई-चलन प्रलंबित आहे, त्वरित दंड भरा, असा मजकूर नमूद केलेला असतो. संबंधित नागरिकांनी उत्सुकतेपोटी किंवा भीतीपोटी ही लिंक उघडल्यास त्यांच्या मोबाईलमध्ये नकळत एक बनावट ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर इंस्टॉल होते. असे सॉफ्टवेअर अत्यंत धोकादायक असून, त्याच्या माध्यमातून मोबाईलमधील सर्व वैयक्तिक माहिती हॅक केली जाते.
नागरिकांना आर्थिक फटका
या फसव्या ॲपद्वारे मोबाईलमधील बँक खात्याची माहिती, यूपीआय तपशील, ओटीपी, पासवर्ड, फोटो, संपर्क क्रमांक तसेच इतर महत्त्वाचा डेटा सायबर गुन्हेगारांच्या हाती जातो. यानंतर काही वेळातच नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले जात असून, अनेकांना हजारो ते लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. विशेषतः वाहनधारकांना लक्ष्य करून ही फसवणूक केली जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता ठेवणे हाच अशा फसवणुकीपासून बचावाचा सर्वांत प्रभावी मार्ग असल्याचेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, संशयास्पद संदेश, कॉल किंवा ॲप्सपासून दूर राहावे. मोबाईलमध्ये आधीच अशी संशयास्पद ॲप्स इंस्टॉल झालेली असल्यास ती त्वरित काढून टाकावी आणि बँक तसेच सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदवावी.
संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी
वाहतूक विभागाकडून कोणत्याही वाहनधारकाला दंड भरण्यासाठी लिंक पाठवली जात नाही. तसेच, कोणतेही स्वतंत्र ॲप इंस्टॉल करण्याची गरज नाही. वाहनधारकांनी दंड भरायचा असल्यास केवळ वाहतूक विभागाच्या ठिकाणी जाऊ चलन भरून घ्यावे.
गणेश लोंढे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग