

चाकण: पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार तसेच गुन्हेगारीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाकण पोलिस ठाणे आणि आळंदी पोलिस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण पोलिस ठाणे, तसेच महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विभाजन करून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे अशा दोन नवी पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली आहे.
गृह विभागाने याबाबत 14 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार नवीन पोलिस ठाण्यांसाठी आवश्यक पदनिर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठक झाली. त्यात या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. आता याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित केल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.
या दोन नवीन पोलिस ठाण्यांसाठी विविध संवर्गातील एकूण 332 पदे दोन टप्प्यांत निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अधिकारी व अंमलदार स्तरावरील पदांचा समावेश आहे. यामुळे पोलिस ठाण्यांचे दैनंदिन कामकाज, गस्त, तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
यासाठी 31 कोटी 43 लाख 92 हजार 920 रुपये इतक्या आवर्ती खर्चास, तसेच 30 लाख 58 हजार रुपये इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. नवीन चाकण दक्षिण आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्द निश्चितीचा प्रस्ताव पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने शासनाकडे सादर करायचा आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे.
चाकण व महाळुंगे एमआयडीसी परिसर हा औद्योगिकदृष्ट्या वेगाने वाढणारा भाग आहे. नवीन पोलीस ठाणी सुरू झाल्यामुळे औद्योगिक वसाहती, कामगार वसती, नव्याने विकसित होणारे निवासी भाग याठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखणे अधिक प्रभावी होणार आहे. गुन्हे नियंत्रण, वाहतूक नियमन आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाईस मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पुणे ग््राामीणमधून आयुक्तालयात समावेशानंतर पोलिस बळ मोठ्या संखेने वाढूनही चाकण औद्योगिक भागातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढल्याचेच या भागातील नागरिक सांगतात.