

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची चार सदस्यीय 32 प्रभागाची रचना सोमवारी (दि.6) अंतिम होणार आहे. महापालिकेत नगरसेवक पदाच्या एकूण 128 जागा आहेत. त्यापैकी तब्बल 93 जागा या आरक्षित आहेत. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण असल्याने खुल्या गटातून केवळ 35 जागा असणार आहेत.(Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेच्या 2007 च्या निवडणुकीत एकूण 105 जागा होत्या. फेबुवारी 2017 च्या निवडणूक त्या जागांत वाढ होऊन 128 नगरसेवक संख्या झाली. दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीतही नगरसेवक संख्या 128 आहे. त्यात एकही जागा वाढविण्यात आलेली नाही. सन 2021मधील जनगणना न झाल्याने सन 2011 ची जनगणनेच्या आधारे ही निवडणूक होत आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ करण्यात आली नसल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या एकूण 128 जागांपैकी 50 टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. एकूण 64 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यातील अनुसूचित जातीसाठी एकूण 20 जागा आणि अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव असणार आहेत. इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) 35 जागा आरक्षित असणार आहेत. तर, सर्वसाधारण महिलांसाठी (खुला) एकूण 35 जागा राखीव असणार आहेत. असे तब्बल 93 जागेवर आरक्षण असणार आहे. खुल्या गटातील उमेदवारांना केवळ 35 जागा उपलब्ध असणार आहेत.
खुल्या गटांतून अनेक प्रबळ व सक्षम माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक आहेत. त्यांनी निवडणूक मैदानाची तयारीही सुरू केली आहे. इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता खुल्या गटांतील जागेवर मोठी रस्सीखेच दिसून येणार आहे. त्यावर तोडगा काढताना पक्षश्रेष्ठींना खूपच खल करावा लागणार आहे.
प्रभाग रचनेची प्रक्रिया सोमवारी (दि.6) अंतिम होऊन संपणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यानुसार एकूण 93 जागांवरील आरक्षण सोडत जाहीरपणे काढली जाईल. त्यात कोणाला कोणती जागा सुटते, यावरून त्या इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.
प्रभाग आरक्षणातील जागांची संख्या
महिला संख्या- 64
पुरूष संख्या- 64
अनुसूचित जाती- 20 (पुरुष 10, महिला 10)
अनुसूचित जमाती-3 (पुरुष 1, महिला 2)
इतर मागास वर्ग (ओबीसी)- 35 (पुरुष 17, महिला 18)
सर्वसाधारण महिला (खुला)- 35
एकूण आरक्षित जागा- 93
सर्वसाधारण (खुला)- 35
एकूण जागा- 128
वेळापत्रकानुसार आरक्षण सोडत काढू
पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभागरचना सोमवारी (दि.6) अंतिम होऊन घोषित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार कार्यवाही केली जाईल. तसेच, प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्याची कामकाज केले जाईल. निवडणूक कामकाजासाठी महापालिकेकडून मनुष्यबळ नेमण्यात आले आहे, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.