

लोणावळा : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नगर परिषदेची अंतिम प्रभागरचना 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. पूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेवर अनेक सूचना व हरकती आल्या होत्या. मात्र, किरकोळ दुरुस्ती वगळता प्रभाग जैसे थे ठेवण्यात आले आहेत. आता सर्व इच्छुक व नागरिकांचे लक्ष सध्या प्रभाग आरक्षणे व नगराध्यक्ष पदाचे आरक्षण याकडे लागले आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पुढील महिन्यात निवडणुकीची शक्यता
प्रभागरचना अंतिम झाली असली तरी अनेक इच्छुकांनी आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत. मागील चार वर्षांपासून लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक रखडली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील निवडणुका जानेवारी 2026 पूर्वी होणार आहेत. त्यामुळे लोणावळा नगर परिषदेची निवडणूकदेखील पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात 13 प्रभाग
या निवडणुकीसाठी लोणावळा नगर परिषदेची प्रभागरचना करण्यात आली आहे. शहरामध्ये 13 प्रभाग असून 27 सदस्य संख्या आहे. 12 प्रभाग अनुक्रमे 2 सदस्य व 13 व्या प्रभागात 3 सदस्य असा क्रम असणार आहे. अंतिम प्रभागरचना व नकाशे प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे त्या-त्या प्रभागामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार यांना प्रभाग रचना व त्यांची हद्द, त्यामधील मतदार यांच्या गाठीभेटी घेणे व त्यांच्याशी संपर्क करणे सोयीस्कर होणार आहे.
मतदार याद्यांचादेखील कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, आठ ऑक्टोबरपर्यंत प्रभाग तयार करण्यात येणार आहेत. 8 ते 13 ऑक्टोबरदरम्यान त्यावर सूचना व हरकती घेऊन 28 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान केंद्रांची यादी 7 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलीजाणार आहे.