

चऱ्होली : वडमुखवाडी येथील लक्ष्मीनारायण नगरमध्ये मागील महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंग व चव बदलली आहे. आयुक्त साहेब, आम्ही पण माणसं आहोत. तुम्हीच सांगा, असे मैलामिश्रित पाणी आम्ही कसे प्यायचे? असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत.(Latest Pimpri chinchwad News)
वडमुखवाडीतील साईमंदिराच्या मागील बाजूस लक्ष्मीनारायणनगर ही मोठी वसाहत आहे. या ठिकाणी चढावर आणि उतारावर मोठी लोकवस्ती आहे. या ठिकाणी विविध कॉलनी आहेत. परंतु, या कॉलनी चढ, उतारावर वसलेल्या असल्याने त्यांना मुळातच पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. जो पाणीपुरवठा होत आहे त्यातदेखील ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. लक्ष्मीनारायण नगरमधील कॉलनी नंबर 5 मध्ये ड्रेनेजचे चेंबर तुंबले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मैलामिश्रित पाणी साचत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे. हे पाणी येथील रहिवासी भागात जात आहे.
आरोग्याचा प्रश्न बनतोय गंभीर
संपूर्ण लक्ष्मीनारायणनगरमध्ये अशुद्ध पाण्याची समस्या आहे. घराघरांतून ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी लोकांना प्यावे लागत असल्याने लहान मुले मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत. उलटी, जुलाब, पोटदुखी आदी आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. उपचार करूनही मुलांना बरे वाटत नाही. लहान लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या तक्रारींकडे कानाडोळा
या कॉलनीतील प्रत्येक घरामधील हंड्यातील पाण्याला अत्यंत उग््रा वास येत आहे. हे पाणी वापरण्याजोगेदेखील नाही. येथील नागरिकांनी महापालिकेकडे अनेकवेळा तक्रार करूनदेखील महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांना अशा प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणची संपूर्ण वस्ती उंच सखल भागामध्ये राहत असून आठ नंबर कॉलनीतील ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्यास पाच नंबर आणि सात नंबर कॉलनीतील घराघरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. येथे सतत ड्रेनेज ब्लॉक होत आहे.
आम्ही जुनी पाण्याची लाईन पूर्णपणे बंद केली असून, आता फक्त नवीन लाईनने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. लक्ष्मीनारायण नगरमध्ये सर्व कॉलनीमध्ये नवीन लाईननेच पाणीपुरवठा होत आहे. तरी जर अशुद्ध पाणी येत असेल, तर त्वरित कारवाई करण्यात येईल.
प्रसाद आल्हाट, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग