

पुणे : टेलीग्राम अॅपवरील टास्क पूर्ण केल्यानंतर जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरुणाला तब्बल 29 लाखांचा ऑनलाइन गंडा घातला. ही घटना 18 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर कालावधीत येरवड्यात घडली आहे.
याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण येरवड्यात राहायला असून, 18 ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क केला.
टेलीग्राम अॅपवर दिलेला टास्क पूर्ण केल्यानंतर जादा परतावा मिळवून देतो, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानंतर त्यांना किरकोळ स्वरुपात नफा मिळवून देत विश्वास संपादित केला. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात सायबर चोरट्यांनी तरुणाकडून तब्बल 29 लाख रूपये ऑनलाइनरित्या वर्ग करून घेतले. मात्र, परतावा न देता फसवणूक केली आहे.
दरम्यान दुसर्या घटनेत टेलीग्राम आयडी धारकाने तरुणीला लिंक पाठवून तिला गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 5 लाख 28 हजारांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ही घटना 22 ते 26 जूनला कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी 31 वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.