

पिंपरी : दसरा, विजय, आनंद आणि गोडवा वाटण्याचा दिवस; मात्र याच दिवशी नियतीने एका बापाच्या हातून त्याचे ‘सोने’ हिरावून नेले. पिंपरी-चिंचवडमधील चोविसावाडी येथील रामस्मृती हाउसिंग सोसायटीत गुरुवारी (दि. 2) घडलेल्या या दुर्घटनेत 11 वर्षीय मुलाचा लिफ्ट आणि फ्लोअरच्या मधल्या जागेत अडकून दुर्दैवी अंत झाला. सर्वात हृदयद्रावक म्हणजे, लेकराने शेवटचा श्वास आपल्या वडिलांच्या मांडीवरच सोडला.(Latest Pimpri chinchwad News)
अमेय साहेबराव फडतरे (11) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे लिफ्ट दुर्घटनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वडिलांच्या मांडीवर शेवटचा श्वास
घटनेची माहिती मिळाल्यावर काही वेळात अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. जवानांनी तातडीने प्रयत्न करून लिफ्टमधून अमेयला बाहेर काढले. रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटले. आपल्या लेकराला मांडीवर
घेत वडिलांनी आक्रोश करत हंबरडा फोडला. काही क्षणांतच अमेयची प्राणज्योत मालवली. तरीसुद्धा आशेचा धागा पकडत त्याला धावतपळत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर अमेय आपल्यात नसल्याचे जाहीर केले.
परिसर शोकमग्न
दसऱ्याच्या दिवशी सोन्यासारखी माणसे मिळावीत, अशी लोकांची श्रद्धा असते. मात्र, आमच्या दारातून तर सोन्यासारखे लेकरूच निघून गेले, अशा शब्दांत सोसायटीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. काही क्षणांतच चोविसावाडीचा परिसर शोककल्लोळाने भरून गेला.
अमेय लिफ्ट आणि फ्लोअरच्या मधल्या जागेत अडकला होता. एवढ्या वर्षांत अशी घटना प्रथमच घडली. लिफ्टमधून आम्ही त्वरित त्याला बाहेर काढले; परंतु कदाचित घातक असल्याने त्याचे प्राण दुर्दैवाने वाचू शकले नाहीत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना एकटे लिफ्टमध्ये पाठवू नये तसेच सोसायटी धारकांनी लिफ्ट सेफ्टीसाठी नियमितपणे दुरुस्ती व देखभाल अधिकृत अभियंता मार्फत करून घेणे गरजेचे आहे.
ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी- चिंचवड महापालिका
मृत्युचा थरार
गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे अमेय लिफ्टमध्ये गेला. काही क्षणातच लिफ्ट अचानक दोन मजल्यांच्या मधोमध थांबली. गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, लिफ्ट पुन्हा सुरू होऊन अमेय त्यात अडकला. मदतीसाठी झगडत असतानाच वेळ सरकत गेला. बराच वेळ कोणीच लक्ष न दिल्याने त्याचा आवाज दाबला गेला आणि सोन्यासारखे लेकरू ऐन दसऱ्याच्या दिवशी निपचित पडले.