Pimpri Chinchwad DP Wire Theft: पिंपरी-चिंचवडमध्ये डीपीमधील तांब्याच्या तारा चोरीचे रॅकेट उघड; चौघांना अटक

चोरीचा माल घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांनाही बेड्या; ५.१० लाखांचा मुद्देमाल आणि तीन वाहने जप्त, सात गुन्ह्यांचा उलगडा
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

पिंपरी: आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद या ग्रामीण भागातील विद्युत डीपीमधून तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चोरी करणाऱ्या दोघांसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे. तर, एक साथीदार फरार आहे. आरोपींकडून पाच लाख १० हजार रुपये किमतीच्या तांब्या व ॲल्युमिनियमच्या तारा तसेच गुन्ह्यांसाठी वापरलेली तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे आळंदी आणि चाकण दक्षिण पोलिस ठाण्यांतील एकूण सात गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

Arrested
Pimpri Chinchwad Digital Workers: पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत कामगारांचे बदलते रूप; ‘मजूर’ ते ‘डिजिटल ऑपरेटर’

अक्षय बाबासाहेब काळे (३४, रा. गणेशनगर, खिरपाड वस्ती, भानोबाची कोयाळी, ता. खेड), राहुल दिनकर पोकळे (२०, रा. पोकळेदरा, भानोबाची कोयाळी, ता. खेड), ईजहार ईस्माइल चौधरी (४०, रा. भानोबाची कोयाळी, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) आणि ब्रिजमोहन असर्फीलाल प्रजापती (३०, रा. गोलेगाव रोड, मरकळ, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Arrested
Pimpri Chinchwad Ganeshotsav DJ: पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेला ७० टक्के नागरिकांचा विरोध; ‘आवाजाची मर्यादा पाळा’चा तरुणांचा सूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद या भागात मागील काही काळापासून विद्युत डीपीमधील तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारांच्या चोरीचे प्रकार वाढले होते. या चोऱ्यांमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यावरही परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी डीपी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून संबंधित भागात समांतर तपास सुरू करण्यात आला.

दरम्यान, पोलिस अंमलदार बाळासाहेब खेडकर आणि त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डीपीमधील तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारे काही जण भानोबाची कोयाळी परिसरात आहेत. त्यानुसार, पथकाने परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे अक्षय काळे आणि राहुल पोकळे अशी सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याच्यासोबत मिळून विविध ठिकाणच्या विद्युत डीपीमधील तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा चोरल्याची कबुली दिली.

Arrested
Pratiksha Kharat: बर्फाच्छादित पर्वतांवर तिरंगा अभिमानाने उंचावला!

चोरी केलेल्या तारा भानोबाची कोयाळी आणि मरकळ परिसरातील भंगार व्यावसायिकांना विकल्याची माहितीही आरोपींनी दिली. त्यानंतर पोलिसांनी ईजहार चौधरी आणि ब्रिजमोहन प्रजापती यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद परिसरातून चोरी गेलेल्या पाच लाख १० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा पंचांसमक्ष जप्त केल्या.

तसेच, चोरी करताना वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या दुचाकी आणि चारचाकी अशी तीन वाहने पोलिसांनी जप्त केली. आरोपींकडून आळंदी आणि चाकण दक्षिण पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण सात गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, या गुन्ह्यांतील चोरीस गेलेला १०० टक्के माल हस्तगत करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस तपासात चोरी करणारे आरोपी आणि त्यांच्याकडून चोरीचा माल खरेदी करणारे भंगार व्यावसायिक अशी स्वतंत्र साखळी समोर आली आहे.

Arrested
Moshi Garbage Depot: मोशी दुर्घटनेस 55 दिवस उलटूनही कचरा समस्या कायम; सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

कारवाई करणारे पथक

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे, पोलिस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, ऋषीकेश भोसुरे, युवराज बिराजदार, सागर सूर्यवंशी, सचिन गोनटे, बाळासाहेब खेडकर, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, निखील फपाळे, नितीन गुंजाळ, शशिकांत नांगरे आणि बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली.

सात गुन्ह्यांचा उलगडा

या कारवाईत आळंदी पोलिस ठाण्यात दाखल चार आणि चाकण दक्षिण पोलिस ठाण्यातील तीन असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकरणांत विद्युत डीपीमधून तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला गेल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news