

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 37 एफएसटी, 32 एसएसटी व 44 व्हीएसटी पथकांमार्फत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख ठेवण्यात येत आहे. या स्थापन करण्यात आलेल्या पथकांमार्फत व पोलिस विभागामार्फत 15 डिसेंबर 2025 ते 13 जानेवारी 2026 या तीस दिवसांत 6 दखलपात्र व 11 अदखलपात्र असे एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात विदेशी दारू, गांजा, अंमली पदार्थांसह पिस्तूल, गावठी कट्टे व काडतुसे तसेच, वॉशिंग मशीन आणि 18 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून 15 डिसेंबर 2025 ला आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आचार संहिता कक्षप्रमख सुरेखा माने यांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्षाचे काम सुरू आहे.
कक्षाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पथके व पोलिस विभागामार्फत 15 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागामार्फत 18 लाख 2 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 62 लाख 79 हजार 178 रुपये किमतीची दारू, 49 लाख 11 हजार 531 रुपये किमतीचा गांजा, 9 लाख 33 हजार 300 रुपये किमतीचे एमडी, 7 लाख 89 हजार 700 रुपये किमतीचे ओजी कुश असे अमली पदार्थ.
एकूण 1 लाख 29 हजार 561 रुपये किंमतीच्या 19 वॉशिंग मशीन जप्त करण्यात आले आहेत. यासह 6 पिस्टल, 4 गावठी कट्टे, 15 काडतुसे, 23 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच 1 हजार 4 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय एकूण 71 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने यांनी दिली.