

पिंपरी: शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित होता. विकास प्राधिकरणाकडून त्यावर निर्णय होत नव्हता. शरद पवारांनी तो निर्णय थांबून ठेवला होता. तो प्रश्न आम्ही सोडवला; तसेच महापालिका अंतर्गत ज्यांनी शास्तीकर लावला, तेच आता मते मागायला येतील, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादींवर केली.
चिंचवड येथे प्रचार सभेचे आयोजन मंगळवार (दि. 6) करण्यात आले होते. त्या वेळी बावनकुळे बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड प्राधिकरण क्षेत्रातील बांधकाम व मिळकतींच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे (प्रॉपर्टी कार्ड) महापालिका निवडणुकीनंतर वाटप करण्यात येईल. ज्या लोकांनी शास्तीकर लावला आहे. तेच आता मत मागायला येणार आहेत. त्यामुळे चुकीने बटण दाबले तर, भाजपाने काढलेला शास्तीकर हा पुन्हा तुमच्यावर लादला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, राज्यामध्ये तुकडा बंदी कायदा अंमलबजावणी केली. या कायद्यामुळे गुंठा, दीड गुंठा जागेमध्ये बांधलेल्या घरांची सरकार दरबारी नोंदणी करणे शक्य झाले. येथील घरांचे ड्रोन मॅपिंग देखील करणार आहोत. येथील प्रत्येक घराचे ड्रोन मॅपिंग करून प्रत्येक प्लॉटचा सरकारी नकाशा आम्ही गुगल क्लाऊडवर देणार आहोत. ज्या माध्यमातून गुगलवर नाव टाकल्यानंतर घराचा नकाशा तुम्हांला उपलब्ध होऊ शकेल.
‘त्यांनी’ डोळ्यावर पट्टी बांधली आहे
पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत शहरात विकासकामे झाली आहेत. तरीही काही लोक विचारतात की, नेमके या पाच वर्षात काय केले. असे प्रश्न विचारणारे लोक आंधळे झाले आहेत किंवा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, त्यामुळे त्यांना कदाचित शहरातील विकासकामे दिसत नसतील, अशी टीका बावनकुळे यांनी नाव न घेता राष्ट्रवादी पक्षावर केली.
... मॅपिंगसाठी घरटी चार हजार खर्च
ड्रोन मॅपिंगद्वारे प्रत्येक प्लॉटची, प्रत्येक घराची मोबाईलद्वारे नकाशा प्रिंट मिळणार आहे; परंतु ड्रोन मॅपिंग करण्यासाठी एका घराला चार हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले; मात्र याचा खर्च नेमका कोण करणार, हे स्पष्ट केले नाही.