

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या नऊ तालुक्यातील अग्निशमन विभागसंबंधित कामे जलद आणि विनाअडथळे होणार आहेत. पीएमआरडीएने यापूर्वी 19 ऑनलाईन सेवा सुरु केल्या आहेत. त्यातच आता अग्निशमन विभागाने देखील ऑनलाईन सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे चार सेवा या अर्जदारांना एका क्लिकवर मिळणार आहेत.
पीएमआरडीए हद्दीतील नागरिकांना सुलभ आणि कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी 19 सेवा सुविधा ऑनलाईन सुरु केल्या होत्या. त्यातच आता अग्निशमन विभागाला देखील समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना, अर्जदारांना हे कामे आता घरसबल्या ऑनलाईन करता येणार आहेत. यामुळे पीएमआरडीएच्या कार्यालयापासनू लांब तालुक्यातील नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक गतिमान आणि विहीत कालमार्यदेत देण्यासाठी अधिनियम अंमलात आहे. त्याअंतर्गत या सेवा सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात विकास परवानगी विभागात बदल करण्यात आले असून, या विभागातील जवळपास 12 कामे हे आता ऑनलाईन स्वरुपात करण्यात आली आहेत.
त्यानंतर जमीन व मालमत्ता विभागात देखील 3 सेवा ऑनलाईन आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणाअभावी यातील अग्निशमन विभागाच्या सेवा या ऑनलाईन सुरु नव्हत्या त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. आता त्या देखील सेवा या ऑनलाईन सुरु झाल्या आहेत.
पोर्टलवर सेवा उपलब्ध
पीएमआरडीच्या संबंधित अग्निशमन विभागातील चार सेवा या आरटीएस या पीएमआरडीएच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत. यामुळे महत्त्वाचे दाखले आणि परवाने मिळणे अधिक सोईचे होणार आहे. यात पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र, अग्निशमन बंदोबस्त, प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखला, अंतिम अग्निशमन ना हरकत दाखला या सेवा सुरु झाल्या आहेत.