

पिंपरी: राजकीय जीवनात उठता-बसता आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग््रेासच्या कार्यकर्त्यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निमूटपणे मित्रपक्षाचे काम करावे लागले. कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांसाठी हा संघर्षही स्वीकारला. आता, महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी भष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पवार यांना भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे राज्यात मांडीला मांडी लावून बसलेल्या दोन्ही पक्षाचे नेते स्थानिक कार्यकर्त्यांसाठी एकमेकांना भिडल्याचे दिसत आहे.
...मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचे नेत्यांसमोर आव्हान
राज्यात नेत्यांचे मैत्रीचे संबंध आहे. तेथे खांद्याला खांदा लावून राज्याचे काम केले जात आहे; मात्र महापालिका निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एकमेकांच्या पक्षाकडून झालेल्या गैरव्यवहार व भष्टाचाराची प्रकरणे उघडी केली जात आहेत. राज्यातील मैत्रीचे संबंध जपताना नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागत आहे, ही बाब शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे.
एकमेकांचे हाडवैरी
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग््रेास हे दोन्ही पक्षांमध्ये शत्रुत्वाचे नाते होते. हे एकमेकांचे हाडवैरी होते. भाजपा-राष्ट्रवादी काँग््रेास पक्षांनी एकमेकांच्या विरोधात भष्टाचाराचे मुद्दे पुढे करून आंदोलने केली आहेत. अनेक आक्रमक आंदोलने व मोर्चे झाले आहेत. एकमेकांना विरोध केल्याशिवाय दोन्ही पक्षांचे अस्तित्व दिसत नव्हते. मात्र, राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्यानंतर अजित पवार थेट भाजपासोबत सत्तेत जाऊन बसले. ज्या पक्षाला आयुष्यभर विरोध केला, राजकीय शत्रुत्व घेतले. त्याच पक्षासोबत आता भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खांद्याला खांदा लावून काम करावे लागत आहे.
पालिकेतील भष्ट कारभारावर बोललो : पवार
पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या नऊ वर्षांत भाजपाच्या स्थानिक कारभाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भष्टाचार केला आहे. निविदेत रिंग केली. नियमांची तोडफोड करत मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली. कर्ज काढले. ठेवी मोडल्या. तब्बल चार हजार कोटींची बिले देणे बाकी आहे. शहरातील कामात नियोजन नाही. त्यांना व्हिजन नाही. दादागिरी वाढली आहे. त्याबाबत मी बोललो. आघाडीची सत्ता असताना आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलो होतो. मी राज्यातील कामाबाबत काही बोललो नाही. संपूर्ण भाजपावर बोलल्याचे दाखवले जात आहे. ते त्यांची भूमिका मांडत आहेत. तो संविधानाने दिलेला अधिकार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा, विधानसभेसाठी राजकीय मतभेद विसरून काम
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांचे काम भाजपासह राष्ट्रवादीला करावे लागले. राजकीय शत्रू असलेल्या शिवसेनेचा झेंडा कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतला. पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांचा पराभव करणाऱ्या उमेदवारांचा प्रचार अजित पवारांसह पक्षांच्या कार्यकर्त्यांना करावा लागला. विधानसभेतही तेच चित्र होते. भाजपाचे महेश लांडगे व शंकर जगताप यांचा प्रचार राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना करावा लागला. राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचे घड्याळ चिन्ह घेऊन शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग््रेासच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले. कार्यकर्त्यांनी पूर्वीच्या शत्रू पक्षांसाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जीव तोडून प्रामाणिकपणे काम केले.
पालिका निवडणुकीत एकमेकांवर आरोपांच्या फैरी
आता, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत स्थानिक कार्यकर्ते नगरसेवक पदासाठी निवडणूक मैदानात आहेत. त्यांच्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत पालिकेतील गेल्या नऊ वर्षांतील भष्टाचाराबाबतचा धुराळा उडवला आहे. त्यावरून भाजपाचे नेते व पदाधिकारी संतापले आहेत. महायुतीत असून भष्टाचाराचे आरोप केल्याने युतीतील समन्वय बिघडत असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही बोललो तर, महागात पडेल, असा थेट इशारा अजित पवारांना देण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत कार्यकर्ते विजयी व्हावेत, म्हणून नेते एकमेकांच्या विरोधात भिडले आहेत. त्यावरून शहरात मोठी चर्चा रंगली आहे. या आरोप-प्रत्यारोपात कोण बाजी मारणार, कोणत्या पक्षाला फायदा होणार, याचे ठोकताळे बांधले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी बुधवार (दि. 14) पर्यंत झडतील.