

पिंपळे निंलख: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ आणि सुंदर शहर संकल्पनेसाठी विविध उपक्रम, योजना तसेच जनजागृती करण्यात येत आहे; परंतु महापालिकेचा आरोग्य विभागच नियमांना तीलांजली देत असेल, तर नागरिकांकडून काय अपेक्षा करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव मार्गावर साफसफाई कर्मचारीच रस्त्याच्या कडेला संकलित केलेला कचरा टाकत आहेत. तर कचरा संकलन करणार्ऱ्या घंटागाड्या क्षमतेपेक्षा जास्त कचरा वाहत असल्याने रस्त्यावरच कचरा पडत आहे. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसरात आज सकाळी स्वच्छता व्यवस्थेची भयावह अवस्था उघड करणाऱ्या दोन धक्कादायक घटना नागरिकांच्या निदर्शनास आल्या. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला असला, तरी प्रत्यक्षात प्रशासनाचेच कर्मचारी नियम मोडताना दिसल्याने नागरिकांमध्ये तीव संताप उसळला आहे.
आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पाहणी करून संबंधित विभागीय कर्मचारी आणि ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करू. हे जर असे घडले असेल तर आम्हाला त्याची खंत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
शांताराम माने, आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय विभाग
सुदर्शन चौक, रामकृष्ण मंगल कार्याकडून पिंपळे गुरवकडे जाणारी घंटागाडी पहिल्या घटनेत, नियमित कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या घंटागाडीने आज सकाळी अक्षरशः ’कचरा प्रसार मोहीम’ राबवल्याचे चित्र पाहायला मिळाले. गाडी वेगाने पुढे जात असताना तिच्या मागे रस्त्यावर कचरा सांडत होता. रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याकडे चालक वा संबंधित विभागीय कर्मचाऱ्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने संपूर्ण मार्गावर अस्वच्छता निर्माण झाली.
हे निदर्शनास आणून दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लगेच विभागीय कर्मचारी व वाहनचालकांना भेटून या संदर्भात विचारणा करतो. जर असे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
दीपक कोठियाना, मुख्य आरोग्य निरीक्षक, ह क्षेत्रीय कार्यालय
सूचना फलकाखालीच कचऱ्याचे ढीग
पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या रोडवर सुदर्शन चौकालगत प्रशासनाने ‘येथे कचरा टाकू नये; उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होईल’ असा सूचना फलक लावला आहे. त्याच बोर्डखाली सफाई कर्मचारी कचरा टाकताना दिसले. नियम बनवणारेच जर नियम तोडत असतील, तर नागरिकांनी काय करावे हा संतप्त सवाल नागरिकांनी सरळ प्रशासनालाच विचारला.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली बोर्ड आणि जाहिराती दिसतात. पण प्रत्यक्ष स्वच्छता नाही. प्रशासनाचे कर्मचारीच कचरा टाकत असतील, तर ही निंदनीय बाब आहे. आम्ही कर भरतो आणि बदल्यात कचरा मिळतो, हा न्याय आहे का?
डॉ. धम्मरत्न गायकवाड, युवक शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया