

पिंपळे निलख: पिंपळे निलख ते सांगवी फाटादरम्यानच्या रक्षक चौक परिसरात वाहतूक शिस्तीचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्ग हेच आता दुचाकीस्वारांच्या अतिक्रमणाचे केंद्र बनले असून, त्यातच वाढलेले रस्त्यावरील अतिक्रमण आणि रखडलेले फ्लायओव्हरचे काम यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
नागरिकांना चालावे लागते रस्त्यावरुन
सायकल ट्रॅकवर दुचाकींचा सुळसुळाट हा येथे दररोजचाच प्रकार बनला आहे. सायकलस्वारांना मागून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत बाजूला होण्यास भाग पाडले जात असल्याने सुरक्षिततेसाठी उभारलेला हा मार्गच धोकादायक ठरत आहे. पादचारी मार्गाची परिस्थितीही बिकट झाली असून, दुचाकींच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावर उतरून चालावे लागत आहे.
वाहतूक कोंडीत भर
यामध्ये भर घालणारा आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे. रक्षक चौक परिसरात मोठ्या प्रमाणात हातगाड्या, फळ आणि कपडे विक्रेते आणि विविध स्टॉल्स उभे राहत असल्याने आधीच कोंडीने त्रस्त असलेल्या रस्त्यावर अधिकच ताण निर्माण होत आहे. या अतिक्रमणामुळे वाहनांची हालचाल मंदावतेच, पण अपघाताचा धोकादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फ्लायओव्हरचे काम सुरू असल्याने अगोदरच रस्ता अरुंद झाला आहे, त्यात या हातगाड्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उघड्या केबल्समुळे अपघाताची भीती
या अतिक्रमणाचा फटका उद्यान विभागालाही बसल्याचे चित्र समोर आले आहे. दुचाकीस्वारांनी पादचारी मार्गावर प्रवेश करताना झाडांना पाणी देण्यासाठी टाकलेली ड्रीप सिंचनाची प्रमुख पाइपलाईन फोडली आहे. त्यामुळे झाडांना नियमित पाणीपुरवठा खंडित झाला असून, टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. याच परिसरात विद्युत खांबांजवळील बॉक्स उघडे पडल्याचेही निदर्शनास आले आहे. केबल्स उघड्या अवस्थेत असल्याने पावसाळ्यात विद्युत प्रवाह बाहेर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
दरम्यान, रक्षक चौकातील फ्लायओव्हरचे कामही संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांच्या नाराजीत भर पडली आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेले हे काम वर्ष उलटूनही पूर्ण झालेले नाही. परिणामी वाहतूककोंडी वाढत असून, हा पूल नेमका कधी नागरिकांच्या सेवेत येणार, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठंमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची अशी दुर्दशा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे. रक्षक चौक परिसरातील ही परिस्थिती केवळ वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न नसून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन ठोस उपाययोजना करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.