

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातही कुत्र्यांचा मुक्त वावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. उद्यानातील प्रवेशद्वारासमोरील वॉकिंग ट्रॅकवरच कुत्र्यांचा ठिय्या असल्याने सकाळी व्यायाम व मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहाटे पाच वाजतापासून उद्यानात नागरिकांची मोठी गर्दी असते. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने येतात. मात्र, कुत्र्यांमुळे नागरिकांना अक्षरशः हातात काठी घेऊन मॉर्निंग वॉक करावा लागत आहे. लहान मुलांचा पाठलाग करणे ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर अचानक धावून जाणे तसेच कुत्र्यांपासून बचाव करताना नागरिकांची धावपळ होणे असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यातून छोटे-मोठे अपघातही घडत असल्याने भीती आणखी वाढली आहे.
कुत्र्यांचा प्रवेश रोखणे गरजेचे
कुत्र्यांमुळे उद्यानातील नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सकाळच्या व्यायामाच्या वातावरणावरही परिणाम होत आहे. पालकांना लहान मुलांना उद्यानात मोकळेपणाने सोडताना भीती वाटत आहे. ज्येष्ठ नागरिकांना अचानक कुत्रे अंगावर धावून आल्यास पडून दुखापत होण्याचा धोका आहे. तसेच कुत्र्यांचा कळप तयार झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उद्यानातील सुरक्षारक्षकांनी कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी नियमित गस्त ठेवण्याची गरज आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासह कुत्रे आत येण्याच्या इतर मार्गांची पाहणी करून ते बंद करणे गरजेचे आहे.
प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का?
एखाद्या लहान मुलावर, महिलेवर किंवा ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महापालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि राजमाता जिजाऊ उद्यान नागरिकांसाठी सुरक्षित करावे.
सुरक्षारक्षकांची बघ्याची भूमिका
उद्यानाच्या प्रवेशद्वारावर तीन-तीन सुरक्षारक्षकांसह कर्मचारी तैनात असतानाही कुत्रे उद्यानात मुक्तपणे प्रवेश करतातच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक नेमके काय करतात? कुत्रे प्रवेशद्वाराच्या समोरील वॉकिंग ट्रॅकवर बसलेले असतानाही त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असताना उद्यानासारख्या सार्वजनिक ठिकाणी ही परिस्थिती असणे धोकादायक आहे. महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या सुरक्षा विभागाला याबाबत तात्काळ कळविण्यात येईल. तसेच संबंधित ठिकाणी असलेल्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील.
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक, पिंपरी चिंचवड मनपा
उद्यानात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. नसबंदी करूनही कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. अनेक वेळा ही कुत्री जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांच्या अंगावर धावून जातात. उद्यानात कुत्र्यांच्या झुंडी फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्येष्ठ नागरिकांना तर सुरक्षिततेसाठी हातात काठी घेऊन उद्यानात फिरावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा.
शिवाजी साळुंखे, ज्येष्ठ नागरिक, पिंपळे गुरव