

पिंपळे गुरव : पवना नदीपात्रालगत असलेल्या तुळजाभवानी मंदिरासमोरील पंपिंग स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे मैलामिश्रित पाणी थेट पवनानदी पात्रात मिसळत आहे. परिणामी परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने येथे त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या भागांमधून पवनानदी वाहते तुळजाभवानी मंदिराला लागूनच लक्ष्मीनगर, भालेकरनगर येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. तेथील सांडपाण्याची समस्या सोडविण्यासाठी या भागात ड्रेनेजलाईनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, सांडपाणी वाहिन्यांमधून गळती होत असून, ड्रेनेजचे चेंबर ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे थेट नदीपात्रात हे मैलामिश्रित पाणी मिसळून पवना नदीचे प्रदूषण वाढत आहे.
पंपिंग स्टेशनमधील गाळाची तातडीने सफाई करावी.
सांडपाण्याच्या वाहिन्यांमधील गळती दुरुस्त करावी.
पवना नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करावेत.
नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबवावी.
या परिसरातून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि वाहनचालक ये-जा करतात. दुर्गंधी आणि घाणेमुळे रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. पिंपळे गुरवच्या मुख्य चौकामध्ये तुळजाभवानी मंदिर असल्याकारणाने दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी तक्रार केली आहे की नदीकाठी उभे राहणे कठीण झाले आहे. संध्याकाळी डासांचा प्रचंड त्रास वाढला आहे. पाण्यातून येणारी दुर्गंधी आरोग्यास धोकादायक ठरत आहे. सांडपाणी थेट नदीत मिसळल्याने पवना नदीच्या पाण्याची गुणवत्ता घसरली असून, परिसरात डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी आणि प्रदूषण वाढले आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर ठिकाणी आमचे कर्मचारी त्वरित पाठविण्यात येतील. पंपिंग यंत्रणा बंद पडल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास तसेच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सांडपाणी चेंबरमधून बाहेर येण्याची शक्यता असते. स्टेशनवरील संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
विनय ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, ड्रेनेज विभाग ह क्षेत्रीय कार्यालय
पाणी ज्या ठिकाणाहून बाहेर पडते त्या ठिकाणी गाळ साचल्यामुळे तेथे स्वच्छतेची आवश्यकता आहे. या संदर्भात पम्पिंग हाऊस येथील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्यात आली आहे. सध्या पंप हाऊसमध्ये पाणी शिरत नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत गाळ काढून स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात येईल.
धनाजी बांगर, कनिष्ठ अभियंता, ह क्षेत्रीय कार्यालय
विद्युत विभागाकडे संबंधित पंप हाऊस आहे. पंप हाऊसमध्ये जेवढे पाणी प्राप्त होते तेवढ्या प्रमाणात पाणी पंप करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. चेंबर तसेच लाईनची स्वच्छता व देखभाल करण्याची जबाबदारी ड्रेनेज विभागाकडे आहे. संबंधित विद्युत अभियंत्यांना स्थळ पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येतील. ड्रेनेजचे सांडपाणी नदीपात्रात जाते हे चुकीचे आहे.
अनिल भालसाकळे, अभियंता, विद्युत विभाग