

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील कवडेनगरमध्ये असलेल्या शिवशक्ती ही बाईक्स लिथियम बॅटरी रिपेअर या गणेश परदेशी यांच्या दुकानाला आज संध्याकाळी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
प्राथमिक माहितीनुसार, दुकानात इलेक्ट्रिक बाईक्ससाठीच्या सहा लिथियम बॅटऱ्या होत्या. त्यापैकी दोन बॅटऱ्या आगीमध्ये पूर्णतः जळून गेल्या असून, दुकानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तपास सुरू असल्याचे अग्निशामक दलाने सांगितले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरातील रहिवासी तसेच बाबुराव कवडे पथ येथील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून आग नियंत्रणात येण्यास सहकार्य केले.
अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.