

अमिन खान
तळेगाव दाभाडे : निवडणुकांच्या मोसमात परिसरातील अनेकांना हंगामी स्वरूपातील रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होत असतात. मात्र, तब्बल आठ वर्षांनंतर तळेगावकरांना मिळणाऱ्या या संधी यंदा सीमित झाल्या आहेत. त्याचे कारण बिनविरोध निवडणुकीचे राजकारण ठरले आहे. लाखाचा टप्पा ओलांडलेल्या तळेगाव दाभाडे शहरातील बाजारपेठांमध्ये त्यामुळे खरेदी विक्रीचा आलेख खालावला आहे. व्यापारी आणि छोटे-मोठे व्यावसायिक तसेच रोजंदारीची कामे करणाऱ्या बेरोजगार त्यामुळे नाराज झाले असल्याचे चित्र आहे.
जिजामाता चौकात दररोज सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान मजूर अड्डा भरतो. किमान 300 ते 400 कारागीर, मजूर आणि महिला तेथे कामाच्या शोधात येत असतात. अनेक वेळा काही अल्पवयीनदेखील दिसतात. विशेषतः कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश आणि राज्यातील बीड, अहिल्यानगर या पट्ट्यातील बेरोजगार श्रमिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याशी चर्चा केली असता गेल्या महिन्यापासून ठेकेदार काम मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात मिळेल ते काम करायला तयार आहोत, पण कामच नाही त्याला काय करणार, असे काही महिला श्रमिकांनी सांगितले.
एकीकडे रोजंदारीचे काम मिळावे, दिवसाला 300 चारशे मिळावे म्हणून मजूर अड्ड्यावर कामाची आस लागलेले श्रमिक तर दुसरीकडे शहरातील सोन्या-चांदीच्या, दारूच्या आणि मोबाईलच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असे चित्र आहे. सणासुदीला असणारी या दुकानातील गर्दी आजही कायम आहे.
निवडणूक हंगामात प्रभावित झालेल्या व्यवसायात गुलाल, हारफुले, झेंडे, खादीचे शट्र्स, फेटे यासारख्या अनेक वस्तूंच्या दुकानांत मालाला उठाव नाही. ढोल-ताशा पथकांना सुपारी नाही.
तळेगाव दाभाडे शहरात किमान 35 केटर्सर आहेत, त्यांना प्रत्येक निवडणुकीत जेवणावळीच्या ऑर्डर्स मिळतात. परंतु, या वेळी मात्र कमी प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत. तसेच, मंडप, खुर्च्या, गाद्याख सतरंज्या धूळ खात पडून आहेत. प्रचाराच्या कामासाठी पूर्वी लोक मिळत नसत, आता लोकांना कामच मिळत नाही. निवडणूक झाली असती तर मार्केटमध्ये पैसा फिरला असता, असे व्यावसायिकांनी सांगितले.
दरम्यान, निवडणुकीतील बिनविरोध प्रक्रियेमुळे स्थानिक अर्थकारणालाही मोठा फटका बसला असून, अनेकांचा रोजगार बुडाला आहे. याबाबत दैनिक पुढारी प्रतिनिधीने बाजारपेठेचा कानोसा घेतला असता, निवडणूक साहित्य पुरवठादार, केटरर्स, मंडपवाले तसेच ग््रााफिक्स आर्टिस्ट आणि सेवा क्षेत्रातील अनेकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे समोर आले आहे. व्यापारी व्यावसायिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, निवडणुकीची बाजारपेठ यंदा मंदीत असून, गेल्यावेळेपेक्षा यंदाच्या उलाढालीत तब्बल 80 ते 90 टक्के घसरण झाली आहे. या व्यवसायातील अनेक श्रमिकांचा रोजगारदेखील बुडाला आहे.
निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणेला तसेच विविध राजकीय पक्षांना लागणारे साहित्य, सेवा आणि इतर गरजेच्या वस्तूंची तळेगाव दाभाडे ही मोठी बाजारपेठ आहे. मावळ तालुक्यासह शेजारील तालुक्यातील निवडणुकीसाठी त्यांना मोठी मागणी असते. त्यात मंडप उभारणी, केटरिंग यासारख्या सेवा व्यावसायिकांचा समावेश आहे. साहित्य खरेदीसह ही उलाढाल मोठी होत असते. आमदारकीचा निवडणूक वगळता गेल्या चार वर्षांत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबत गेल्याने खरेदी-विक्री ठप्प झाली असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकांच्या निवडणुकीत चार पैसे मिळण्याची आस होती. मात्र, ती बिनविरोध होण्याचे समजल्यावर ही संधीदेखील गेल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तळेगाव दाभाडे ही तालुक्याची आर्थिक राजधानी झाली आहे. इथे जवळपास 40 हून अधिक राष्ट्रीय बँका आणि मोठ्या बँकांच्या शाखा आहेत. 16 हुन अधिक पतसंस्था गेल्या 40 वर्षांपासून व्यवसायवृद्धीसाठी पतपुरवठा करत असल्याने येथे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक प्रगती करत आहेत. लग्न आदी कार्यक्रमांमधून जसे त्यांना हंगामी उत्पन्न मिळते, त्यात निवडणुकीच्या हंगामाचा मोठा वाटा आहे. मात्र, बिनविरोध निवडणुकीमुळे तो बुडाला आहे.
निलेश फलके, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक