

लोणावळा: लोणावळा रेल्वे स्टेशनवर दाखविलेल्या तत्परतेने रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) दोन कर्मचाऱ्यांनी नवविवाहीत प्रवाशांचा जीव वाचवत कौतुकास्पद धाडस दाखवले.
शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी चेन्नई एक्सप्रेस (22159) पकडण्याच्या प्रयत्नात 38 वर्षीय प्रवासी श्रुंग गुप्ता यांचा पाय घसरून ते गाडी व प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत पडण्याची वेळ आली.
या गंभीर परिस्थितीत ड्यूटीवर तैनात असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मोहन आणि आरक्षक विपीन कुमार यांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ धाव घेत गुप्ता यांना ओढून सुरक्षित प्लॅटफॉर्मवर आणले.
त्यांच्या समन्वयाने आणि फूर्तीमुळे एक मोठा अपघात टळला. श्रुंग गुप्ता हे एक आठवड्यापूर्वीच विवाहबद्ध झाले असून, ते पत्नीसमवेत पंढरपूर येथे जात होते. प्लॅटफॉर्मवर चिक्की घेण्यासाठी उतरले असताना ट्रेन सुटू लागली आणि ती पकडण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली.
सुदैवाने गुप्ता यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रसंगानंतर नवविवाहीत दाम्पत्याने आरपीएफ लोणावळा कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपण आम्हाला नवीन जीवन दिले, असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.