

काटेवाडी: ढेकळवाडी (ता. बारामती) परिसरातील घुलेवस्ती लगतच्या ढेकळवाडी ते काटेवाडी या मार्गावर रस्त्यालगत उभारण्यात आलेले विद्युत रोहित्र सध्या अत्यंत धोकादायक झाले आहे. रोहित्रातील फ्यूज बसण्याच्या ठिकाणी कोणतेही संरक्षण कवच किंवा सुरक्षित फ्यूज प्रणाली नसून केवळ उघड्या अवस्थेत तारा बांधून जोडणी करण्यात आली आहे. या निष्काळजी कामामुळे अपघाताची शक्यता वाढली असून परिसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच ये-जा करणारे नागरिक चिंतेत आहेत.
सध्या छत्रपती कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. धोकादायक रोहित्राजवळच ऊस तोडणी सुरू आहे. तोडणी कामगारांच्या लहान मुलांसह मोठी वर्दळ या परिसरात आहे. रोहित्राची फ्यूज पेटी पूर्णपणे उघडी असून कोणतीही झाकण व्यवस्था नसल्याने ती पावसात, उष्णतेत किंवा अचानक झालेल्या स्पार्किंगमध्ये गंभीर दुर्घटनेचे रूप घेऊ शकते.
दिवसाढवळ्या शेतकरी कामासाठी जात असताना किंवा रात्री वाहनधारक याच मार्गावरून प्रवास करताना या उघड्या जोडण्यांमुळे विजेचा धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरण विभागाने याकडे तत्काळ लक्ष घालून योग्य दर्जाचे फ्यूज बसवावेत, रोहित्र दुरुस्त करून सुरक्षित झाकणाची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या भागातील विद्युत संरक्षकांची नियमित तपासणी करून संभाव्य अपघात टाळावेत, असेही ग्रामस्थांचे मत आहे.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी सांगितले की, फ्यूजच्या जागी उघड्या तारा ठेवणे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेशी थट्टा करण्यासारखे आहे. एखादा अपघात झाल्यावरच उपाययोजना करण्याची पद्धत बंद झाली पाहिजे.