

पिंपळे गुरव: सुदर्शननगर परिसरात सोमवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. परिसरातील मुख्य ट्रान्सफॉर्मरची एनटी केबल अचानक खराब झाल्याने वीजपुरवठा बंद पडला. दुरुस्तीचे काम वेळेत सुरू केले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे तब्बल आठ ते दहा तास वीजपुरवठ्याविना नागरिकांना राहवे लागले.
अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती तसेच व्यापारी व्यवहारांवर परिणाम झाला. सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा खंडित झाला. पाणी पंप बंद पडले. रेफ्रिजरेटर, इंटरनेट राऊटर, मोबाईल चार्जिंग यासारखी दैनंदिन उपकरणे ठप्प झाल्याने नागरिकांची चांगलीच अडचण झाली. घरातून वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांनाही नेटवर्क व विजेअभावी अडथळ्यांना सामोरे जावे लागले.
स्थानिक रहिवाशांनी अचानक गेलेल्या विजेबाबत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. व्यवसायिक वर्गालाही या खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला. दुकाने अंधारात असल्याने कार्ड पेमेंट, बिलिंग मशीन, फ्रीज, एसी यांसारखी उपकरणे बंद झाली. अनेकांनी दुकाने उघडूनही ग्राहक सेवा देणे अशक्य असल्याने नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली.
दरम्यान, वीज विभागाचे पथक सकाळपासून घटनास्थळी दाखल झाले होते. खराब झालेली अँटी केबल तपासणीदरम्यान पूर्णपणे बदलण्याची गरज असल्याचे निदर्शनास आल्याने दुरुस्तीला उशीर झाला, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली. केबल बदलल्यानंतर ट्रान्सफॉर्मर सुरळीत करण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू होते.
ट्रांसफार्मरची एनटी केबल खराब झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. संबंधित केबलची तपासणी करण्यासाठी परीक्षण पथक, टेस्टिंग व्हॅनने तपासणी केली. केबलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. रात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
संतोष पांचरस, सहाय्यक अभियंता