

पुणे : ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेसाठी काटेकोर नियोजन करण्यात यावे, रस्ते विकासापासून वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा ते स्पर्धा मार्गावरील सुरक्षेपर्यंत सर्व बाबी अत्यंत दक्षतेने पार पडाव्यात, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी जीतेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आर. एस. रहाणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक दिलीप शिंदे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रशांत वडेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन्ही महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळाने सीएफआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम पूर्ण करावे. दरवर्षी स्पर्धा होणार असल्याने रस्ते टिकाऊ, उच्च गुणवत्तेचे आणि पावसाळ्यातील वाहून जाण्याची व्यवस्था सक्षम असावी, यावर त्यांनी भर दिला. स्पर्धेत अडथळा ठरतील, असे होर्डिंग्ज हटविणे, पर्यटनस्थळांसह मार्गदर्शक फलक लावणे, तसेच स्पर्धा संपेपर्यंत मार्गाची नियमित तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भटक्या कुत्र्यांच्या त्रास टाळण्यासाठी विशेष उपाय, मार्गावरील गावांमध्ये जनजागृती, तसेच पाळीव जनावरे रस्त्यावर न येण्यासाठी स्थानिक सहभाग सुनिश्चित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
स्पर्धा कालावधीत सर्व वाहतूक पूर्णपणे वळविण्यात येणार असल्याने योग्य नियोजन, केबल-टीव्ही वायर व वीजवाहिन्यांचे अडथळे दूर करणे व संपर्क व्यवस्था सुरळीत ठेवणे या बाबींवरही त्यांनी भर दिला.वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ते मनुष्यबळ, गरज पडल्यास अतिरिक्त जवान, होमगार्ड, एनसीसी यांचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली. उत्साही युवकांना स्वयंसेवक म्हणून जोडण्याचेही आवाहन करण्यात आले.
जिल्हाधिकारी जीतेंद्र डूडी यांनी स्पर्धेचे क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाकडून बाईक ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स, आपत्कालीन आरोग्य सेवा आणि खासगी रुग्णालयांचे सहकार्य यासंदर्भातील तयारी सादर करण्यात आली. स्पर्धकांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथके सज्ज ठेवली जाणार आहेत.
बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि सायकलिंग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.