

पिंपरी: गणवेश खरेदीप्रक्रिया आता सुरू केल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळेल. त्यामुळे स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रक्रिया सुरू करून गणवेशांची खरेदी करण्यात यावी, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या बालवाड्यांसह प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय व पीटी गणवेश, स्वेटर, सॉक्स, रेनकोट, दप्तर, वेस्टकोट, हातरुमाल, हेअर बॅण्ड, रिबीन, टाय आदी साहित्य सोलापूर येथील जगदंबा संस्थेकडून खरेदी करण्याचा ठराव दोन एप्रिलच्या शिक्षण समितीने मंजूर केला आहे. त्याला स्थायी समितीने 22 एप्रिलला मान्यता दिली आहे. त्यानुसार गणवेश खरेदीप्रक्रिया सुरू करण्यात यावी.
शासनाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार उत्तम दर्जाचे साहित्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे काम सोलापूर येथील श्री जगदंबा महिला रेडिमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित या अंध व दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थेमार्फत केले जाणार आहे. तिच्या माध्यमातून अनेक अंध, दिव्यांग नागरिकांना प्रवाहात आणून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्या संस्थेमार्फत साहित्य घेतल्यास महापालिकेच्या नावलौकीकात भर पडेल, अशी शिफारस विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या नावाचा दुरुपयोग ?
शिक्षण समितीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने 22 एप्रिलच्या सभेत मान्यता दिली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संदीप वाघेरे व विकास साने यांची सूचक व अनुमोदक म्हणून नावे आहेत. मात्र, त्या विषयास आम्ही समंती दिलेली नाही. तसा कोणताही ठराव सुचवलेला नाही. त्यामुळे आमच्या नावाची नोंद तातडीने रद्द करावी, असे पत्र संदीप वाघेरे व विकास साने यांनी आयुक्तांना दिले आहे. त्यानंतर नगर सचिव विभागाने त्यात दुरुस्ती केली आहे. सूचक व अनुमोदक म्हणून बाबासाहेब त्रिभुवन व शालिनी गुजर यांच्या नावांची नोंद केली आहे.
सूचक, अनुमोदक नावात दुरुस्ती
स्थायी समिती सभेच्या 22 एप्रिलच्या वृत्तांत्तामध्ये दुरुस्ती करावी, असे पत्र सभापतींना दिले आहे. कार्यपत्रिका क्रमांक 12, विषय क्रमांक 7, ठराव क्रमांक 366 यावर सूचक संदीप वाघेरे व अनुमोदक विकास साने यांची नावे आहेत. नाव टाकताना स्थायी समिती सभेतील सभासदांची नावे अनुक्रमे दाखल केली आहेत. ही दुरुस्ती करण्यात आली आहे, असे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.