

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानाचा पारा चाळीशी जवळ गेल्यामुळे पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे. शहरासह उपनगरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नळाला थेट विद्युत मोटारपंप लावून पाणी खेचणाऱ्या पिंपळे निलखमध्ये 14, थेरगाव येथील पवारनगर, पडवळनगरमध्ये 9 अशा एकूण 23 विद्युत मोटारपंप जप्त करण्यात आल आहेत.
चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी, भोसरी, डुडुळगाव, थेरगाव, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, काळेवाडी, प्राधिकरण, काळेवाडी, किवळे, वाल्हेकरवाडीसह शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विस्कळीत, अपुरा, अवेळी पाणीपुरवठयाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी गाड्या धुणे, अंगणामध्ये, रस्त्यावर पिण्याचे पाणी मारणे, जिने धुणे, झाडे व बागेस पाणी घालणे टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
नागरिक नळजोडास थेट विद्युत पंप लावून मोठ्या प्रमाणात पाणी खेचतात. त्यामुळे परिसरातील इतर नागरिकांना पुरेसा प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर आळा बसविण्यासाठी तसेच, तक्रारीचे निरसन करण्यासाठी पिंपळे निलख परिसरात 14, थेरगाव येथील पवारनगर व पडवळनगरमध्ये 9 अशा एकूण 23 मोटार पंप जप्त करण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारे शहरातील इतर भागातही मोटारपंप लावून पाणी खेचणाऱ्या नागरिकांच्या मोटारी जप्त करण्यात येणार आहेत. नळजोडास थेट विद्युत मोटारपंप लावू नये. कोणत्याही खासगी प्लंबरद्वारे अनधिकृत नळजोड घेऊ नये. वॉशिंग सेंटरचालकांनी पिण्याचे पाणी वापर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
वॉशिंग सेंटर चालकांवर कारवाईचे काय?
शहरात वॉशिंग सेंटरची संख्या मोठी आहे. यामधील अनेक वॉशिंग सेंटरचालक बोअरवेलचे पाणी वापरतात. तर, काही व्यावसायिक नळजोड घेऊन वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरत आहे. मात्र, काही वॉशिंग सेंटर चालक अनधिकृत नळजोड घेऊन पिण्याचे पाणी वापरत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा वॉशिंग सेंटरचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सर्वेक्षण करून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
फौजदारी कारवाईकडे दुर्लक्ष
नळजोडास थेट विद्युत मोटार पंप लावून पाणी खेचण्याचे प्रमाण शहरात अधिक आहे. वरच्या मजल्यावर तसेच,गच्चीवरील टाकीत पाणी भरण्यासाठी अशा प्रकारे मोटार पंप लावले जातात. त्या काही हाऊसिंग सोसायट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे परिसरातील इतर नागरिकांना पाणी मिळत नाही. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नळजोडास थेट विद्युत मोटारपंप लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाकडून दिला जातो. मात्र, केवळ मोटारपंप जप्त केले जातात. मात्र, फौजदारी कारवाई केली जात नाही. त्यामुळे कारवाईनंतरही काही जणांकडून पुन्हा मोटारपंप लावून पाणी खेचले जात असल्याचे आढळून आले आहे.
शहरात सातत्याने कारवाई केली जात आहे
उन्हाळ्यात पाण्याची मागणीही वाढली जाते. नागरिकांनी वाहने धुणे, अंगणामध्ये, रस्त्यावर पिण्याचे पाणी मारणे टाळावे. जास्त पाणी मिळावे, म्हणून काही नागरिक महापालिकेच्या नळजोडास थेट विद्युत मोटार पंप लावून पाणी खेचतात. अशा नागरिकांवर कारवाई सुरू केली असून, पिंपळे निलख आणि थेरगाव परिसरात 23 मोटारपंप जप्त करण्यात आल्या आहेत. ती कारवाई संपूर्ण शहरात करण्यात येत आहे. वॉशिंग सेंटरचालकांनी पिण्याचे पाणी वाहने धुण्यासाठी वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.