

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर नागरिकांचा विश्वास जपण्याची जबाबदारी आहे. निवडणूक व्यवस्थापन, सुविधा व कायदेशीर बाबींची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून, मतमोजणी 16 जानेवारीला आहे. या अनुषंगाने पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पोलिस आयुक्त कार्यालयात पार पडली.
बैठकीला निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांच्यासह पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे, निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगे, डॉ. दिप्ती सूर्यवंशी, अर्चना पठारे, हिम्मत खराडे, अनिल पवार, नितीन गवळी, पल्लवी घाडगे, आचारसंहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, डॉ. शिवाजी पवार, विशाल गायकवाड, संदीप अटोळे यांच्यासह महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार,उपायुक्त अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, कार्यकारी अभियंता हरविंदसिंग बन्सल आदी उपस्थित होते.
उपायुक्त सचिन पवार यांनी बैठकीच्या महापालिकेने निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. पोलिस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, निवडणूक ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी असते. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत, नियमबद्ध व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवरील सुविधा, मनुष्यबळ व्यवस्थापन व तांत्रिक बाबींवर विशेष भर दिला जात आहे. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने निवडणूक काळात नागरिकांना सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देण्यात येईल.
पोलिस आयुक्त चौबे म्हणाले की, निवडणूक शांततेत व सुरळित पार पाडणे ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी महापालिका प्रशासनासोबत पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करावे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य द्या. शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक तेवढा बंदोबस्त, गस्त आणि तांत्रिक निगराणी ठेवण्यात आली आहे. बैठकीत पोलिस बंदोबस्तावर चर्चा करण्यात आली.
सर्व पथकांनी दक्ष राहावे
निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी, एफएस आणि व्हीएसटी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्व पथकांनी निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्ष राहावे. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनीदेखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून कामकाज करावे, असे निर्देश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.